

विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एनसीडी’द्वारे 267 कोटींची आर्थिक मदत दिल्याचे भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी जाहीर केले, तसेच आमदार अभिजीत पाटील यांना मुख्यमंत्र्यांचा “आशीर्वाद” असल्याचेही विधान केले.
दरेकर यांच्या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये खळबळ उडाली आहे, कारण पाटील हे भाजपविरोधी आघाडीचे प्रमुख नेते असून त्यांचे भाजप नेत्यांशी सख्य वाढत आहे.
पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत आमदार पाटील यांची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण त्यांच्या समर्थकांनी भाजपविरोधी आघाडीबाबत सावध भूमिका घेण्याचा सल्ला दिला असून, त्यांनी शेवटच्या क्षणी भाजपकडे झुकते माप घेतल्यास विरोधी आघाडी कोलमडू शकते.
Pandharpur, 06 November : आमदार अभिजीत पाटील यांना विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ‘एनसीडी’च्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत मिळवून दिली आहे, त्यामुळे आमदार पाटील यांना मुख्यमंत्र्यांचे आशीवार्द आहेत, असं मोठ विधान भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आहे. त्यामुळे ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार दरेकर यांनी केलेल्या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात खळबळ उडाली आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात चालू हंगामामध्ये उत्पादित झालेल्या पहिल्या पाच साखर पोत्यांचे पूजन मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा आमदार प्रवीण दरेकर (MLA Praveen Darekar) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार दरेकर यांनी आमदार पाटील यांचे कौैतुक करत, त्यांना मुख्यमंत्र्यांचा आशीवार्द असल्याचे म्हटले आहे.
आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी बंद पडलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना पुन्हा चालू करण्यासाठी मोठे कष्ट घेतले आहेत. मुंबई सहकारी बॅंकेनेही कारखान्याला मोठी मदत केलेली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखाना सर्वसामान्य शेतकरी सभासदांचा असून तो चालू झाला पाहिजे, या भूमिकेतून आम्ही पक्ष धर्म जात न पाहता शेतकऱ्यांसाठी मदत केली. कारखाना चालवत असताना आर्थिक अडचणी येतात, त्या सोडविण्यासाठी त्यांनी चिकाटीने प्रयत्न केले आहेत.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला अलीकडेच आर्थिक मदतीची गरज होती. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी तातडीने एनसीडीच्या माध्यमातून 267 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले होते, त्यामुळेच कारखाना आज सुरळीतपणे सुरु असल्याची आठवणही आमदार दरेकर यांनी करुन दिली. कारखान्यावर स्वतः मुख्यमंत्री येणार होते. पण त्यांना येता आले नाही. त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला येत आले, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, विठ्ठल कारखान्याच्या सीएनजी प्रकल्प उदघाटनाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना जरूर निमंत्रण देऊ, ते नक्की येतील, असा मला विश्वास आहे, असे आमदार पाटील यांनी नमूद केले.
पंढरपूर नगरपालिकेत कोंडी होणार
नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर निवडणुक लढवणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले. भाजपविरोधात सर्वपक्षीय आघाडीसाठी आमदार अभिजीत पाटील यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. भाजपविरोधात भक्कम आघाडीसाठी त्यांनी बैठकाही सुरु केल्या आहेत.
दुसरीकडे आमदार अभिजीत पाटील यांची भाजप नेत्यांबरोबर उठबस वाढली आहे. भाजप नेते प्रविण दरेकर, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी त्यांचे सख्य आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. अशा परिस्थितीमध्ये आमदार अभिजीत पाटील यांना भाजपविरोधात आघाडी करणे कितपत फायदेशीर ठरणार, यांचीही चर्चा सुरु झाली आहे.
विरोधी आघाडीचं काय
आमदार पाटील यांच्या जवळच्या अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपविरोधात आघाडी न करण्याचा त्यांना सल्ला दिला आहे, त्यामुळे आमदार अभिजीत पाटील यांची पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही ‘जरा सबुरीनं घ्या’ असा सल्ला दिल्याची चर्चा सुरु आहे. आमदार पाटील यांनी ऐनवेळी भाजपबाबत सोईस्कर भूमिका घेतल्यास विरोधी आघाडीचं काय होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
Q1. आमदार प्रवीण दरेकर यांनी कोणते विधान केले?
A1. त्यांनी सांगितले की आमदार अभिजीत पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद असून ‘एनसीडी’द्वारे 267 कोटींची मदत मिळाली.
Q2. या विधानामुळे कोणत्या पक्षात खळबळ उडाली?
A2. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठी खळबळ उडाली.
Q3. पंढरपूर नगरपालिकेत काय राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे?
A3. भाजप स्वबळावर लढणार असल्याने आणि पाटील यांच्या दोन्ही बाजूंशी सख्यामुळे त्यांची राजकीय कोंडी झाली आहे.
Q4. आमदार अभिजीत पाटील यांना कार्यकर्त्यांनी कोणता सल्ला दिला आहे?
A4. त्यांनी भाजपविरोधी आघाडी न करण्याचा आणि संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.