Koregaon News : कोरेगाव शहर आणि ल्हासुर्णे गावाला जोडणाऱ्या साकव पुलाच्या बांधकामास ‘नाबार्ड’मधून मान्यता देण्यात आली आहे. त्यास तब्बल साडेतीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या पुलामुळे ही दोन्ही गावे अधिक जवळ येणार आहेत. पण, या पुलावरुन कोरेगावचे आमदार महेश शिंदे Mahesh Shinde व राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांच्यात श्रेयवाद रंगला आहे. दोघांनीही या पुलासाठी पाठपुरावा केल्याचे सांगून आपल्याच प्रयत्नांमुळे हे काम मार्गी लागल्याचे म्हटले आहे. या पुलामुळे कोरेगाव व ल्हासुर्णेतील अंतर कमी होतानाच कोरेगावातील या दोन आमदारांतील श्रेयवादाचे अंतर वाढले आहे.
वांगणा नदीवर कोरेगाव शहराच्या स्मशानभूमिनजीक पूल उभारण्याची गरज होती, त्यादृष्टीने दोन्ही गावच्या शेतकऱ्यांनी आमदार महेश शिंदे यांची भेट घेऊन निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुलाच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यासाठी पत्र दिले होते.पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीदेखील या पुलाचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी प्रयत्न केलेले होते. त्यानुसार महायुती सरकारने ‘नाबार्ड’मधून साडेतीन कोटी रुपये पुलाच्या कामासाठी मंजूर केले आहेत.
यासंदर्भात आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले, की सध्या ल्हासुर्णे येथील नागरिकांना ल्हासुर्णेफाटा येथे येऊन त्यानंतर सातारा-पंढरपूर महामार्गाने कोरेगावकडे जावे लागते. ल्हासुर्णेकरांचा कोरेगावशी नित्याचा संपर्क आहे. या पार्श्वभूमीवर जांब-ल्हासुर्णे-कोरेगाव-कुमठे-सांगवी-चिमणगाव-भंडारमाची या ठिकाणी वांगणा नदीवर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी दोन्ही गावांतील नागरिकांकडून होत होती. या मागणीनुसार वांगणा नदीवर पूल उभारण्याच्या कामासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यास आता यश आले आहे. त्यासाठी 'नाबार्ड २८' अंतर्गत साडेतीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. .
हा रस्ता ठरणार विकासाचे प्रवेशद्वार!
जांब बुद्रुक येथून सुरू असलेला इतर जिल्हा मार्ग क्र. ७९ हा ल्हासुर्णे-कोरेगाव-कुमठे-सांगवी-चिमणगाव-भंडारमाची असा असून, तो कोरेगाव आणि खटाव तालुक्यांना जोडणारा व सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून तो नजीकच्या काळात ओळखला जाणार आहे. भंडारमाचीतून वर्धनगडला खिंड रस्त्याने जोडले जाणार असून, हा रस्ता भविष्यकाळात विकासाचे प्रवेशद्वार ठरणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.