कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (Kolhapur District Bank Election) आज (ता. २१) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. सत्तारुढ गटाने उमेदवारी नाकारलेल्या विद्यमान संचालिका उदयानी साळुंखे व संचालक पी. जी. शिंदे यांच्या पत्नी सौ. लतिका यांनी शिवसेनेचा (Shiv Sena) रस्ता धरला. शिवसेनेकडून या दोघींना महिला प्रतिनिधी गटाकडून उमेदवारी जाहिर झाली.
दरम्यान, या निवडणुकीत शिवेसेनेच्या नेतृत्वाखाली समविचारी पक्षाचे स्वतंत्र्य पॅनेल आहे. मात्र, शिवेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनीच पक्षाची सात सोडली आहे. निवेदिता माने यांनी शिवसेनेला सोडून सत्तारुढ गटाची उमेदवारी स्वीकारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्याचे पालकमंत्री काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्तारुढ पॅनल आहे. या निवडणुकीत महिला प्रतिनिधी गटातून सत्तारुढ गटाकडून माने यांचे नाव निश्चित होते.
याच गटातून दुसऱ्या जागेवर कुणाला घ्यायचे या बाबत गेले दोन दिवस खलबते सुरु होती. सोमवारी रात्री शिवसेना आणि सत्तारुढ गटाची चर्चा फिसकटली. या गटातील शिवसेनेची जागा रिक्त सोडून दुसऱ्या जागेवर कॉंग्रेसकडून रुतिका काटकर यांची उमेवारी जाहिर करण्यात आली. त्यामुळे साळुंखे यांचा पत्ता कट झाला. त्याचप्रमाणे गगनबावडा तालुका विकास संस्था गटाकडून विद्यमान संचालक पी. जी. शिंदे यांनी स्वत:चा अर्ज न भरता महिला प्रतिनिधी गटाकडून पत्नी लतिका यांचा अर्ज दाखल केला होता. सत्तारुढ गटाने त्यांनाही डावलल्याने त्यांनी शिवसेनेचा मार्ग धरत उमेदवारी स्वीकारली. त्यामुळे अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी जिल्हा बॅंकेचे राजकारण रंगात आले आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्हातील अनेक निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या मात्र, जिल्हा बॅंकेत काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला डावलुन भाजपला सोबत घेतले हे दुदैवी आहे. सत्तारूढ पक्षांकडून सोयीचे राजकारण केले जात आहे. शिवसेनेचा केवळ वापर करुन घेतला जात आहे. भाजपला सोबत घेतल्यामुळे महाविकास आघाडी राहिली नाही, यामुळे सर्व समविचारी पक्ष हे एकत्र येवून सत्तारूढ गटाला टक्कर देण्याचा निर्णय घेतला असल्याचा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, खासदार संजय मंडलिक व माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिला.
यावेळी दुधवडकर म्हणाले, जिल्हा बॅंकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली जाईल, यासाठी आम्ही मुश्रीफ आणि सतेज पाटीलांना दुपारपर्यंत वेळ दिली होता. मात्र, तरीही त्यांना आमचा प्रस्ताव मान्य झाला नाही. त्यांनी भाजपसोबत युती केली आणि शिवसेनेला डावलले. त्यामुळे शिवसेना म्हणून आम्ही सर्व समविचारी पक्ष जिल्हा बॅंकेची निवडणूक ताकदीने लढवणार. यावेळी नरके म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने कोल्हापूरात झालेल्या सर्व घडमोडींची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आणि संस्थांमध्ये सोयीचे राजकारण केले जात, असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.