

Solapur, 15 September : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची रणधुमाळी आता ऐन रंगात येऊ लागली आहे. निवडणुकीसाठी मतदार प्रतिनिधींचे ठराव झाल्यानंतर सध्या राजकीय जुळवाजुळवीला वेग आला आहे. मात्र, बॅंकेच्या निवडणुकीत ८८ च्या कारवाईचा मुद्दा कळीचा ठरत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी जुने मातब्बर नेते पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या माध्यमातून प्रयत्नशील असताना एका भाजप नेत्याने ८८ च्या कारवाईमध्ये अडकलेल्या संचालकांना पुन्हा बॅंकेत एन्ट्री देऊ नका, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. आता तो भाजपचा नेता कोण, अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच भाजप नेत्यांची गेस्ट हाऊसवर एक महत्वपूर्ण बैठक झाली. त्या बैठकीत काही नेत्यांनी सहकारातील कलम ८८ अन्वये डीसीसी बॅंकेच्या नुकसानीच्या भरपाईसाठी पाठविण्यात आलेल्या महसुली नोटिशीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, ज्या संचालकांचे निधन झाले आहे, त्यांच्या वारसांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
या वसुलीच्या नोटिशीबाबत बोलताना काही माजी संचालकांनी ‘आम्ही कर्जच घेतले नाही, त्यामुळे कर्जवसुलीची जबाबदारी आमच्यावर का? ज्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांच्याकडून ते वसूल करा, आम्हाला ८८ च्या जबाबदारीतून मोकळे करा आणि आमचा निवडणुकीला उभा राहण्याचा मार्ग मोकळा करा, हे पालकमंत्र्यांना सांगा, अशा शब्दांत माजी संचालकांनी आपल्या भावना मांडल्या. त्यामुळे माजी संचालकांचा पुन्हा बॅंकेत येण्याचे जोरदार प्रयत्न दिसून येत आहे.
माजी संचालकांच्या विरोधात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि भाजप नेत्यांनी आवाज उठविला होता. त्यामुळे ८८ मध्ये अडकलेल्या माजी संचालकांना पुन्हा सोबत घेतले तर भाजपवर जोरदार टीका होईल, असे भाजपच्या जुन्या नेत्यांचा दावा आहे. मात्र, माजी संचालकांना बॅंकेत ‘नो एन्ट्री’ केल्यास वेगळे राजकारण रंगण्याचीही चर्चा आहे, त्यामुळे भाजप नेत्यांची अडचण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
माजी संचालकांच्या बॅंकेतील प्रवेशाबाबतचा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र भाजपमधील एका गटाने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे माजी संचालकांना पुन्हा बॅंकेत घेऊ नये, यासाठी फिल्डिंग लावली आहे.
आता माजी संचालकांची बॅंकेतील एन्ट्री पूर्णपणे भाजप नेत्यांवर अवलंबून आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हातात माजी संचालकांचे भविष्य आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.