महेश माळवे
श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - श्रीरामपूरात एका खासगी कार्यक्रमाला खासदार डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ( Dr. Sujay Vikhe Patil said, NCP was born to end Shiv Sena )
खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच शिवसेना संपवण्यासासाठी झाला आहे. दोन वर्षांत शिवसेना संपल्याशिवाय राहणार नाही, असे भाकीत वर्तवून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नादी लागू नये. जेवढे लवकर होईल तेवढे बाजूला व्हावे, असा सल्ला खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, की एकीकडे सर्वसामान्य शिवसैनिक, खासदार शिवसेनेसाठी रस्त्यावर उतरले होते, तर दुसरीकडे राष्ट्रवादी कोल्हापुरात संकल्प सभा घेतली. ह्या सभेत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचा आणि शिवसेनेचा साधा उल्लेखही केला नाही. स्व. बाळासाहेब विखेंपासून शिवसेनेशी आमचे संबंध आहेत. शिवसेनेबद्दल विखे परिवाराला कायमच आदर राहील. राणा, संजय राऊत, किरीट सोमय्या यांच्या पलीकडे राज्यसरकारने बोलावे. दूध, कांदा, शेतकरी, वीज प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी व सरकारने भूमिका घ्यावी.
स्थानिक राजकारणावर बोलताना ते म्हणाले, राहुरी चालला नसता तर अशोकची अवस्था वाईट झाली असती. अशोकच्या कार्यक्षेत्रातील दीड लाख टन ऊस राहुरीने गाळप केला. आम्ही मदतीसाठी येतो. श्रीरामपुरात अद्याप तीन लाख टन ऊस शिल्लक आहे. शेतकरी देशोधडीला लागला. शेतकऱ्यांचा आवाज बनून आपण बोलत राहणार. गोरगरीब जनतेलावाली नाही. श्रीरामपूरने विखे कुटुंबावर प्रेम केले म्हणून येथील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. विखेंनी श्रीरामपूरचे नेतृत्व करावी अशी जनतेची अपेक्षा. आम्हाला आमची कामे, संस्था, प्रपंच आहेत. तुम्ही सक्षम नेतृत्व द्या आम्ही हस्तक्षेप थांबवतो, असे त्यांनी ठामपणे संगितले.
धनश्री विखे नगराध्यक्षा होणार ? अश्या सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत ते म्हणाले, या पालिकेत नको रे बाबा. येथे कोणाबरोबर निवडणूक लढवितात, कोणाची साथ देतात आणि कोणाशी चर्चा करतील याचा काही नेम नाही. अशी पालिका राज्यात पाहिली नाही. श्रीरामपुरात कोण कोणत्या गाडीत कधी बसेल आणि उतरेल याचा नेम नाही. सहा महिन्यांनी येतो त्यावेळी बऱ्याच घडामोडी घडतात. सर्व राजकीय गणिते बदलतात. विखे कुटूंबातील कोणालाही येथील नगराध्यक्षा अथवा आमदार व्हायचे नाही. येथील राजकीय सत्ता अस्थिर आहे. नेवासे, संगमनेरमध्ये आमचा त्रास, पक्षविरोधी काम केल्याचे आरोप होतात. मात्र, त्याला उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत.
काही मंडळी सकाळी आम्हाला आणि रात्री संगमनेरला भेटतात. इकडे गोड बोलतात आणि संस्था बंद करण्यासाठी मंत्रालयात भेटी घेतात, असा टोला कोणाचे नाव न घेता लगावला. 40 आमदारांचे महसूलमंत्री होतात. ज्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी दिली त्यांनी एकतरी शिवसेना आमदार निवडून आणून दाखवा, असे आवाहन करताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव घेण्याचे टाळले.
आमदार किंवा महसूलमंत्र्यांच्या सांगण्यावरून अधिकाऱ्यांनो आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय कराल तर याद राखा. मी राधाकृष्ण विखे नाही. सुजय विखे आहे. मी स्पष्ट राजकारण करतो, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला.
तुमच्याकडे उत्तम कौशल्य, कार्यक्षमता असून उपयोग नाही. येथे लॉटरी सिस्टम चालते, तुम्ही मॅनेज होणारे असाल तर पद मिळतात. त्यामुळे नव्या पिढीने राजकारणात येऊ नये, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
किसान रेल्वे सुरू करणार
अहमदनगर जिल्ह्यात एक लाख हेक्टर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. असे असताना केवळ रेल्वेने वाहतूक होत असल्याने लासलगावला चांगला भाव मिळतो. त्यामुळे श्रीरामपूरला नवीन मालधक्का व किसान रेल्वे सुरू करण्यासाठी व्यापारी व कांदा उत्पादकांची बैठक घेणार आहे. तसेच रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊ हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.