

Solapur, 08 September (विठ्ठल सुतार) : बहुमताने सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे अधिकारी जुमानत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अधिकारी कामकाजात विश्वासात घेत नसल्यामुळे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी स्थायी समितीच्या मागील बैठक सोडून जाण्याचा प्रयत्न केला होता. आता फायली वेळेत मंजूर होत नसल्यामुळे संतापलेल्या वैद्य यांनी थेट आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर तातडीने हालचाली होऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या ‘ओएसडी’ने यशस्वी मध्यस्थी करत ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न केला.
जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. कारण प्रशासनाकडून कामकाजात अपेक्षित सहयोग मिळत नसल्याने अध्यक्ष वैद्य हे अस्वस्थ आहेत. त्यातून त्यांनी मागील बैठकीत ‘आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेणार असाल तर तुम्हीच कामकाज करा,’ असे म्हणत बैठक अर्ध्यावर सोडून निघून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी इतर पदाधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर ते थांबले होते.
त्यानंतर अध्यक्ष दीपक वैद्य यांनी फायली मंजूर करण्यास विलंब लागत होत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सीईओसह विभागप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले आहेत. वारंवार सूचना करूनही प्रशासनाकडून फायली (संचिका) निकाली काढण्यास विलंब लावला जात आहे, असा आरोप वैद्य यांनी तीव्र नाराजी बोलून दाखवली.
दरम्यान, अधिकाऱ्यांकडून कामकाजात सहकार्य मिळत नसल्याची बाब अध्यक्ष दीपक वैद्य यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्या कानावर घातली आहे. प्रशासनाच्या कामात सुधारणा न झाल्यास पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे तक्रार करू, असे राऊत यांच्याकडून अध्यक्ष वैद्य यांनी सांगण्यात आले होते.
पदाधिकारी असतानाही अधिकारी परस्पर निर्णय कसे घेतात, अधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे, त्यांना विचारले पाहिजे. पण, तसे होताना दिसत नाही. सीईओ कुशल जैन यांच्यासह इतर विभाग प्रमुखांकडून फायली (संचिका) मंजुरीस अधिक काळ लागत आहे, नियमानुसार फायली मंजूर करण्यास विलंब होण्याची काय कारणे आहेत, असा सवाल अध्यक्ष वैद्य यांनी संताप व्यक्त केला होता.
दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे ओएसडी महादेव घुले यांनी तातडीने झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीईओ कुशल जैन यांच्यासह प्रमुख पदाधिकरी आणि अधिकारी यांची बैठक घेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. आता हा वाद शमतो की आणखी वाढत जातो, हे पाहावे लागेल.
झेडपीचे २ कोटींची नुकसान
राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये असलेल्या जिल्हा परिषदेच्या १७६ कोटी रूपयांच्या ठेवींची मुदत संपली होती. त्या ठेवींचे नुतनीकरणाची फाईल प्रशासन प्रमुखाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली. पण त्या फायलीवर वेळेत सही न झाल्याने जिल्हा परिषदेचे २ कोटीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ज्या फायली नियमानुसार येतात, त्यावर तातडीने निर्णय अपेक्षित असताना सोलापूर झेडपीत तसे होताना दिसत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.