राहुल गडकर
Kolhapur Latest News : बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारातील आरोप-प्रत्यारोपाने कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यातच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला घरचा आहेर दिला. भाजप मला तुरुंगात टाकायला निघाले होते. बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत आता भाजप आमच्या सोबत येईल, असे वाटत नाही. ते आले तर कार्यकर्त्यांना मान्य होणार नाही, अशा शब्दांत पालकमंत्री हसन मुश्रीफांनी खंत व्यक्त केली आहे.
बिद्री कारखाना निवडणुकीदरम्यान आयोजित सभासद मेळाव्यात मुश्रीफांनी भाजप आणि शिवसेनेला (शिंदे गट) टोले लगावले. ईडीने केलेली चौकशी आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकरांनी केलेल्या चौकशीच्या मागणीचा मुश्रीफांनी या वेळी समाचार घेतला. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीत आलबेल नाही, हे स्पष्ट होत असल्याची चर्चा सुरू आहे.
बिद्री कारखान्याच्या लेखापरीक्षणाची मागणी आबिटकरांनी केली होती. यावर मुश्रीफ म्हणाले, 'बिद्री कारखान्याचे कामकाज सुरळीत चालू असताना काही जणांनी लेखापरीक्षणाची मागणी करून कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आई अंबाबाई बघून घेईल.' या टीकेमुळे आबिटकर मुश्रीफांना काय प्रत्युत्तर देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादीतील फुटीनंतर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, के.पी. पाटील यांच्या विरोधात ए. वाय. पाटील यांचा संघर्ष अटळ असल्याचे सांगितले जात आहे. कारखाना चेअरमन किंवा विधानसभा असा शब्द वरिष्ठांकडून घ्यावा, असा तगादा समर्थकांनी लावला आहे. या संपूर्ण प्रकरणावर ए. वाय. पाटील यांनी सध्यातरी मौन बाळगले आहे. ते २५ ऑक्टोबरला आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तत्पूर्वी, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेल्या बिद्रीच्या मेळाव्यात त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा जोरात सुरू आहे.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार के. पी. पाटील होते. मात्र, ए. वाय, पाटील अनुपस्थित होते. हसन मुश्रीफ म्हणाले, माजी आमदार के. पी. पाटील, हसन मुश्रीफ व ए. वाय. पाटील या व्यक्ती तीन आहेत. मात्र, या तिघांचे शरीर एकच आहे, असे सांगत मेहुणा-पाहुण्यांच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
आमच्याबरोबर कोण येणार, कोण नाही? हे आपणास माहीत आहे; पण पाच वर्षांत केलेल्या चांगल्या कारभारामुळे आपल्याकडे या निवडणुकीत इच्छुकांची संख्या जादा आहे. मात्र, मर्यादाही खूप आहेत. त्यामुळे आपण सर्वानाच संधी देऊ शकत नाही, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट करताच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.