तासगाव (जि. सांगली) : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचा निकाल तासगाव तालुक्यात अपेक्षेप्रमाणे लागला. उत्कंठा वाढविणारा हा निकाल राष्ट्रवादी काँग्रेसची नैतिक ताकद वाढविणारा ठरणार आहे. बॅंकेच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादीला पर्यायाने माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबा पाटील (R.R. Patil) गटाला ज्या जागेवर नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला होता, ती जागा पुन्हा खेचून आणण्यात आबा गटाने यश मिळविले आहे. शिवाय खासदार संजय पाटील (Sanjay Patil) आणि आमदार सुमनताई पाटील (Suman Patil) यांच्या गटात राजकीय समझोता असल्याच्या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला आहे. (In Sangli District Bank election, NCP candidate won both seats in Tasgaon)
सांगली जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत तासगाव तालुक्यात सोसायटी गटातून आर. आर. आबा पाटील गटाचे बी. एस. पाटील यांनी ४१ मते मिळवत ही जागा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे खेचून आणण्यात यश मिळविले आहे. मागील पराभवाचे उट्टे काढले असले तरी या निवडणुकीतही राष्ट्रवादीची ५ ते ६ मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रक्रिया गटातून सुरेश पाटील यांनी ४३ मते मिळवत विजय मिळविला असला तरी या गटातून होमपीचवर कवठे महांकाळ तालुक्यातून ६ पैकी केवळ दोनच मते पाटील यांना मिळाली आहेत, याचाही विचार करावा लागणार आहे. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसला या निकालाने ‘बळ’ मिळाले असे मानले पाहिजे.
या निवडणुकीसाठी तासगाव तालुक्यातील सगळी राष्ट्रवादी कामाला लागल्याचे सकारात्मक चित्र पहायला मिळाले, ही पक्षासाठी आणखी एक जमेची बाजू मानावी लागेल. सुरेश पाटील यांची रणनीती पुन्हा एकदा यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले. फुटलेली मते ही जुन्या-जेष्ठ नाराज गटातील असल्याचे बोलले जात आहे. एकास एक लढत झाली असती तर मात्र राष्ट्रवादीला आणखी ताकद लावावी लागली असती.
डॉ. प्रताप पाटील आणि भाजपच्या सुनील जाधव यांनी शेवटपर्यंत विजयाचा दावा केला होता. मात्र, निकालानंतर तो भ्रमाचा भोपळा असल्याचे स्पष्ट झाले. प्रताप पाटील यांनी राष्ट्रवादी प्रमाणे भाजपचीही मते फोडल्याने स्पष्ट झाले. या निकाळामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवरील आर. आर. आबा गट आणि खासदार संजय पाटील गटात समझोता झाल्याच्या आरोपाला आता पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत खासदार संजय पाटील आणि आमदार सुमनताई पाटील गटात समझोता असल्याचे चित्र उभे करण्यात आले होते, तसे भाष्य जाहीरपणे केली जायचे. या निवडणुकीचे अर्ज दाखल झाल्यावरही तशी चर्चा पुन्हा रंगली होती. मात्र, प्रचाराचा मूड आणि लागलेला निकाल पहाता वरच्या पातळीवर असलेल्या समझोत्याच्या चर्चेला खो बसला, हे मात्र नक्की.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.