मुंबई : कोरेगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मोठा दावा केला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने ईडीने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या 'जरंडेश्वर शुगर्स' कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. न्यायालयाने ईडीकडून करण्यात आलेल्या या कारवाईवर शिक्कामोर्तब केल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे. तसेच आता हा कारखाना पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
याबाबत बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, “अजित पवारांनी जरंडेश्वर साखर कारखान्यात १२०० कोटींचा घोटाळा केला होता. ईडीने या कारखान्याची प्रॉपर्टी जप्त केली आहे. न्यायालयाने आता त्याला मान्यता दिली आहे. माझी भारत सरकार आणि ईडीला विनंती आहे की हा कारखाना पुन्हा २७ हजार शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा." सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या व्यवहारासंबंधीची कागदपत्रं २१ ऑक्टोबर २०२१ रोजी ईडीसमोर सादर केली होती. त्यावेळी सोमय्यांसोबत कारखान्याचे तत्कालीन पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
१ जुलै २०२१ रोजी ईडीने केली होती कारवाई :
ईडीने प्रॉपर्टी जप्त केल्यानंतर ट्वीट करुन माहिती दिली होती. ईडीने जरंडेश्वर कारखान्याची ६५ कोटी ७५ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित मनी लाँर्डिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती ईडीने दिली होती.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राज्य बँकेतील घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यातील अनेक कारखान्यांनी बँकेकडून कर्ज घेवून ते बुडवल्याने बँकही बुडाली. यानंतर काही साखर कारखान्यांची लिलावात कमी भावात विक्री झाल्याचे आरोप झाले होते. याच लिलावावेळी जरंडेश्वर कारखान्याचीही मूल्यांकनापेक्षा कमी रकमेत विक्री झाल्याचा आरोप कारखान्याच्या संस्थापक अध्यक्षा डॉ शालिनीताई पाटील यांनी केला होता.
या प्रकरणी न्यायालयात गेल्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार जरंडेश्वर कारखान्याच्या खरेदी विक्री व्यवहाराची ‘ईडी’ मार्फत चौकशी सुरू करण्यात आली. ईडीने या कारखान्याला सील ठोकून त्याच्याशीसंबंधित १२०० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. जरंडेश्ववर आधी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ होते. मात्र अजित पवार यांनी बेनामी पद्धतीने व अत्यंत कमी किंमतीत ‘गुरु कमोडीटीज’च्या वतीने कारखान्याचा कब्जा घेतल्याचा आरोप सोमय्या यांनी कागदपत्र सादर करताना केला होता. या विक्री व्यवहारातून कारखान्याच्या सभासदांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.