सोलापूर : सोलापूरच्या राष्ट्रवादीत (ncp)समन्वय ठेवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil)यांनी सांगलीतील त्यांचे विश्वासू सहकारी शेखर माने यांची समन्वयक म्हणून नेमले आहे. मानेंच्या माध्यमातून सोलापुरातील (Solapur)बित्तम बातमी थेट प्रदेशाध्यक्षांच्या कानावर जात असल्याने आगामी काळात विरोधी पक्षासह आणखी कोणाकोणाचा करेक्ट कार्यक्रम होणार ? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
खदखदणाऱ्या सोलापूर राष्ट्रवादीशी जयंत पाटील यांनी संवाद साधला. संवाद जरी परिवाराचा असला तरीही चर्चा मात्र परिवाराच्या बाहेर गेली. सोलापूर महापालिकेची सुत्रे माजी महापौर महेश कोठेंच्या हातात देत प्रदेशाध्यक्षांनी नव्या-जुन्यांच्या वादाचे गाठोडे गुंडाळले अन् "इलेक्टिव्ह मेरिट' ठणकावून सांगितले. राष्ट्रवादीच्या आगामी सर्वच निर्णय प्रक्रियेत कोठेंचे असलेले महत्व आणखी अधोरेखित झाले आहे. मोहोळच्या राजकारणात दोन पाटलांमध्ये (माजी आमदार राजन पाटील व जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील) असलेल्या विसंवादाचा विसर परिवार संवादात झाल्याने "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त'चा डायलॉग अनेकांना आठवला.
सोलापूर शहरात पूर्वी मुठभर असलेल्या राष्ट्रवादीत ढिगभर गट असल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूरची राष्ट्रवादी कायम स्मरणात रहात असेल. या गटबाजीला महेश कोठेंच्या माध्यमातून पर्याय मिळाल्याने सोलापूर शहराबाबत राष्ट्रवादी आशावादी झाली आहे. निवडणुकीपूर्वीच नव्या-जुन्यांचा मुद्दा आणि उपरा व एकनिष्ठाचा मुद्दा स्थानिक बैठकांमधून पुढे आला होता. निवडणुकीत या मुद्याचे भांडवल होण्यापूर्वीच प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कोठे व त्यांच्या समर्थकांकडे प्लस पॉईंट असलेला इलेक्टिव्ह मेरिटचा मुद्दा समोर केला आहे. त्यामुळे आगामी काळात किती वर्षांपासून राष्ट्रवादीत आहे, या मुद्याला फारसे महत्व राहणार नसल्याचे दिसते.
कमी काळात राष्ट्रवादीने टाकलेल्या जबाबदारीमुळे व विश्वासामुळे महेश कोठे चर्चेत आले आहेत. मोहोळमधील राष्ट्रवादीचा परिवार एकामेकांच्या विरोधात जाहीर भाषणातून व्यक्त होत असताना खऱ्या अर्थाने परिवार संवादाची गरज मोहोळ तालुक्यात होती. मोहोळमध्ये परिवार संवाद झाला. परंतु विसंवादाची आठवण ना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना झाली ना माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांना झाली.
जनता दरबारचा नवा ट्रेलर
मोहोळच्या परिवार विसंवादावर कोणीच न बोलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या दौऱ्यात कायम सोबत असणारे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील मोहोळमध्ये का गैरहजर होते ? मोहोळमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा परिवार संवाद सोडून उमेश पाटील पेनूर (ता. मोहोळ) मध्ये शिवसेना नेते चरणराज चवरे यांनी घेतलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला प्राधान्य दिले. मोहोळमधील कार्यक्रम हा खासगी राष्ट्रवादीचा असल्याचे सांगून उमेश पाटील यांनी कामती झेडपीत गटात होणाऱ्या नागरिकांचा जनता दरबारचा नवा ट्रेलर लॉन्च केल्याचे दिसते.
राष्ट्रवादी बदलतेय...
राष्ट्रवादीत नेत्यांच्या मुलांना संधी मिळते, राष्ट्रवादी ठराविक वर्गाचा आणि ठराविक व्यक्तींचा पक्ष असल्याचा वारंवार आरोप केला जातो. हा ठपका पुसून नवी ओळख तयार करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीम सज्ज झाली आहे. सामान्य कुटुंबातून पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर पोहोचलेले महिलाच्या रुपाली चाकणकर, युवकचे मेहबूब शेख, युवतीच्या सक्षणा सलगर, विद्यार्थीचे सुनील गव्हाणे यांची खास ओळख प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करून देत आहेत. पक्षाची पदे त्या-त्या तालुक्यातील नेत्याच्या शिफारसीने वाटली तर तो नेता पक्ष सोडून गेल्यावर त्याची गॅंगही पक्षाला सोडत असल्याचा धगधगता अनुभव राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यामुळे पक्षाची पदे देताना राष्ट्रवादीने धोरण बदलल्याचे दिसत आहे.
ग्रामीण भागात आता इनकमिंग
झेडपी, महापालिका व नगरपरिषदा निवडणुका डोळ्यासमोर असल्या तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेस विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच करू लागली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शंभर प्लस करण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली आहे. राष्ट्रवादीला सोडून गेलेल्यांना आणि इतर पक्षातून राष्ट्रवादीत येऊ इच्छिणाऱ्यांच्या स्वागताला राष्ट्रवादी सज्ज झाली आहे. त्यामुळे येत्या काळात नव्या-जुन्यांचा विषय पूर्णपणे बंद होणार असल्याचे दिसते. आगामी काळात सोलापूरच्या ग्रामीण भागात अनेक दिग्गज राष्ट्रवादीत दिसतील, असे संकेत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दौऱ्यात दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.