Sangli Congress : जयश्रीताईंचा भाजपप्रवेश विशाल पाटलांच्या पथ्य्यावरच... सांगलीची लाईनच क्लिअर झाली!

Sangli Congress : सांगलीमध्ये जयश्री पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये केलेला प्रवेश आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस पक्ष यांच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे.
Vishal Patil, Jayshree Patil And Chandrakant Patil
Vishal Patil, Jayshree Patil And Chandrakant Patilsarkarnama
Published on
Updated on

सांगली : काँग्रेसच्या बंडखोर नेत्या आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री मदन पाटील यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत न जाता भाजपचा रस्ता धरला. खरं तर त्यांनी राष्ट्रवादीत जावं, असा आग्रह कार्यकर्ते करत होते. त्यामागचे सूत्र मुस्लिम, दलित समाजाचा मदनभाऊ पाटील गटाला असलेला जनाधार हे होते. परंतू, ताईंनी भाजपसोबत जाणे अधिक सुरक्षित आणि फायद्याचे ठरेल, असा हिशेब केलेला दिसतोय. पण त्यांचा हा निर्णय खासदार विशाल पाटील यांच्या पथ्यावर पडेल का, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. सध्यातरी काँग्रेसमध्ये नसलेले विशाल आता सांगलीच्या काँग्रेसचे प्रमुख नेते होतील. आता गटबाजी नसेल, ते म्हणतील ती पूर्व दिशा असेल. अट एकच, आमदार विश्वजीत कदम यांच्या कलाने त्यांना घ्यावे लागेल.

श्रीमती जयश्री पाटील यांनी भाजप प्रवेशातून काय साध्य केले? एकतर सर्वात महत्वाची बाब म्हणजे वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात दिवंगत मदनभाऊंचे वारसदार म्हणून त्यांच्यावर जबाबदारी निश्चिती झाली आहे. त्यातून कायदेशीर मार्गाने सोडवणूक करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आता ही सोडवणूक कशी होणार, ती कायदेशीर असेल का, हा वेगळा विषय.

दुसरे म्हणजे महापालिका निवडणुकीत मदनभाऊ समर्थकांचा नेहमीच मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्याकडील कार्यकर्ते हे कसलेले आहेत. मनपाच्या राजकारणातील मुरब्बी आहेत. अर्थात, या कार्यकर्त्यांना सर्वात मोठा जनाधार हा मुस्लिम, दलित वर्गाचा राहिला होता. तो घटक भाजपसोबत येईल का, याकडे लक्ष असेलच. परंतू, काही प्रभागांमध्ये या घटकांशिवाय मदनभाऊ समर्थकांची एक वेगळी ताकद आहे, जी भाजपला निर्विवाद सत्तेपर्यंत नेण्यासाठी फायद्याची ठरू शकते. भाजपने तेच गणित घातले आहे.

Vishal Patil, Jayshree Patil And Chandrakant Patil
Congress Politics : पुणे काँग्रेस शहराध्यक्षपदाबाबत प्रदेशाध्यक्षांनी घेतला निर्णय, आता 'त्या' सर्व चर्चांना फुलस्टॉप!

विधानसभेला काँग्रेसमधील फुटीचे कारण ठरलेल्या जयश्रीताई स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी बेरजेचे गणित ठरतील, असा भाजपचा कयास आहे. मिरज पूर्व आणि मिरज पश्चिम या दोन्ही भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी या गटाचा फायदा भाजपला होऊ शकतो. अर्थात, ताईंचा गट मोठा आहे. त्यात अनेक मातब्बर आहेत. त्या सर्वांनाच संधी मिळेल, असे नाही. त्यांचा भाजपमधला वाटा किती असेल, यावर बरीच गणिते अवलंबून असणार आहेत. ज्यांनी संधी मिळणार नाही, अशांवर विशाल पाटील यांचे लक्ष असेल.

खासदार विशाल पाटील यांना ही आता संधी वाटते आहे. कारण, नेहमीच सांगली काँग्रेसमध्ये विशाल यांनी दोन पावले मागे घ्यायला लागली होती. मदनभाऊंचा गट सातत्याने वरचढ ठरत आला होता. वसंतदादा घराण्यातदेखील अनेकदा त्यातूनच संघर्ष झाला होता. अगदी विशाल यांचे वडील माजी खासदार दिवंगत प्रकाशबापू पाटील आणि दिवंगत मदन पाटील हे एकमेकांविरोधात लोकसभा लढले होते. मदनभाऊ पाटील आणि विशाल यांच्यात जिल्हा बँकेला लढत झाली होती. त्यात विशाल जिंकले होते. आता विशाल काँग्रेसचे एकहाती नेतृत्व करू शकतात, आमदार विश्वजीत यांच्या मदतीने. कारण, विश्वजीत यांचा विशाल यांच्या प्रभावक्षेत्रात एक स्वतंत्र गट आहे. वसंतदादा घराण्यावर प्रेम करणारा एक मोठा वर्ग येथे आहेच. त्याला जातीय समीकरणांची मजबूत जोड मिळाली तर विशाल यांनी महापालिका निवडणुकीत चांगली ताकद मिळेल, असा विश्वास वाटतो आहे.

Vishal Patil, Jayshree Patil And Chandrakant Patil
Congress Government : हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकार संकटात; मंत्र्यांच्या लेकानं उडवून दिली खळबळ

मदनभाऊंचे अनेक कट्टर समर्थक भाजपसोबत जायला तयार नाहीत. विशेषतः मुस्लिम कार्यकर्त्यांनी तूर्त अंतर राखले आहे. ही सगळी मंडळी विशाल यांच्या नेतृत्वात एकत्र येण्याची शक्यता निर्माण होताना दिसत आहे. तसे झाल्यास भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत या ठिकाणी उभी राहू शकते. या परिस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विश्वजीत आणि विशाल यांच्यासोबत समझोता करण्याचे धोरण ठेवले तर महाविकास आघाडी म्हणून चांगली लढत देता येणे शक्य होणार आहे. विशाल पाटील यांनी त्यादृष्टीने जुळवाजुळव सुरु केली आहे.

भाजप सावध आहे. विरोधकांमध्ये उभी फूट पाडून त्यांची ताकद कमी करण्याची खेळी भाजपने सातत्याने केली आहे. यावेळी पटावर तसे मोहरे मांडता येतील का, याचाही विचार केला जाऊ शकतो. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे काही महत्वाचे नेते आहेत. या पक्षाचा कसा वापर केला जाईल, हेही महत्वाचे ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com