अहमदनगर : श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द झाल्यावर त्या जागी पोटनिवडणूक झाली. यात भाजपचे ( BJP ) उमेदवार प्रदीप परदेशी विजयी झाले. त्याबद्दल परदेशी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) विधान परिषद आमदार अरुण जगताप यांनी सत्कार केला होता. यावरून अहमदनगर शहर काँग्रेस ( Congress ) जिल्हाध्यक्ष किरण काळे ( Kiran Kale ) यांनी बैठक घेऊन राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्त्वावर जोरदार टीका केली. Kiran Kale said, local NCP leadership works to increase BJP ...
नुकत्याच झालेल्या महापालिका पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला. या पार्श्वभूमीवर आयोजित शहर जिल्हा काँग्रेसची मंथन बैठक कालिका प्राईड येथील पक्ष कार्यालयात झाली. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करून विजयी झालेल्या भाजप उमेदवाराचा सत्कार केल्या बद्दल यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संतप्त भावना शहर जिल्हाध्यक्षांसमोर व्यक्त केल्या. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, इंटकचे जिल्हाध्यक्ष डॉ.हनिफ शेख, काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, क्रीडा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गिते, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अज्जू शेख, उपाध्यक्ष अरुण धामणे यांच्यासह पक्षाच्या महिला, युवक, कामगार, विद्यार्थी, वकील, शिक्षक आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
किरण काळे म्हणाले, शहरातील स्थानिक राष्ट्रवादीचे नेतृत्व हे सातत्याने शहरातील भाजपशी सलगी करत भाजप वाढविण्यासाठीच काम करते आहे की काय असा सवाल उपस्थित करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मंथन बैठकीत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वावर तोफ डागली. यावेळी कार्यकर्त्यांनी 2023 च्या आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी स्वबळावर लढण्याची मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याकडे केली आहे.
किरण काळे पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या भावनांची आपण दखल घेतली आहे. शहरातील काही नेतेमंडळी एका पक्षात राहून शहरातील सर्वच पक्ष आम्ही चालवतो अशा आविर्भावात आहेत. पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचा शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला याची खंत काँग्रेस पक्षाला आहे. शिवसेनेच्या नेत्यांची या संदर्भामध्ये आपण निवडणुकीनंतर संवाद साधला आहे. सेना, काँग्रेसचे संबंध उत्तम आहेत. काँग्रेस ही कुणाच्या दावणीला नाही. मागील अडीच वर्ष भाजपने शहरात राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्ता उपभोगली. मात्र या अभद्र युतीने शहर भकास करून ठेवले. शहरातील रस्त्यांची दुरावस्था आहे. कुणाला कुणा बरोबर जायचे ते जाऊद्या. मात्र स्वबळावरती काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागण्याचे आदेश यावेळी काळे यांनी बैठकीत दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.