
मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे आज दुपारी तीन वाजता मोटारीने कोल्हापूरला रवाना झाले आहेत. मुंबईतील सिद्धविनायकाचे बाहेरूनच दर्शन घेऊन त्यांनी कोल्हापूर दौऱ्याची सुरुवात केली. दरम्यान मागच्या वेळी मुश्रीफ समर्थकांनी सोमय्या यांना धडा शिकविण्याचा इशारा दिला होता. त्यांची भूमिका आता काय असणार आहे, याकडे राज्याचे लक्ष असणार आहे. (Kirit Somaiya leave for Kolhapur to lodge complaint against Hasan Mushrif)
किरीट सोमय्या यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. त्याला मुश्रीफ यांनी उत्तर देत सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर सोमय्या हे मुश्रीफ यांच्या कारखान्याची माहिती घेण्यासाठी अनंत चतुर्थीच्या दिवशी कोल्हापूरला निघाले होते. त्यावेळी त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा बंदीची नोटीस बजावली होती, त्यामुळे वातावरण चिघळले होते. पोलिसांचा विरोध डावलून सोमय्या हे कोल्हापूरला निघाले होते. पण, सातारा पोलिसांनी विनंती केल्यानंतर त्यांनी कऱ्हाडहूनच माघारी जाणे पसंत केले होते. तो दौरा त्यांनी आजपासून सुरू केला आहे.
किरीट सोमय्या हे ह्या वेळी मोटारीने कोल्हापूर दौऱ्याकरिता निघाले आहेत. या दौऱ्याची सुरुवात ते सिद्धीविनायकाचं दर्शन घेऊन करणार होते. पण मंदिरं अद्याप सुरू झाली नसल्याने सोमय्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेता आलं नाही. पोलिसांनी सोमय्यांना प्रवेशद्वाराबाहेरच अडवून बाहेरून दर्शन घेण्याची विनंती केली, त्यानुसार त्यांनी बाहेरून दर्शन घेतले आहे.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचा आज मुक्काम असणार आहे. उद्या (ता. २८ सप्टेंबर) सकाळी कोल्हापुरात पोचल्यानंतर ते अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सरसेनापती संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहारासंबंधीची तक्रार कागल तालुक्यातील मुरगुड पोलिस ठाण्यात ते देणार आहेत. त्याबाबत पत्रकार परिषद घेत माहिती देणार आहेत.
दरम्यान, मागील दौऱ्याच्या वेळी मुश्रीफ समर्थकांकडून सोमय्यांना कोल्हापूर न येण्याचा इशारा दिला होता. ते कोल्हापुरात आल्यास त्यांचा कोल्हापूर पद्धतीने पाहुणचार करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले होते, त्यामुळे मागील दौऱ्याच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. आता मुश्रीफ समर्थक काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. पण खुद्द हसन मुश्रीफ यांनीच सोमय्यांना अडवू नका, त्यांना कोल्हापूर येऊ द्या, असे आवाहन आपल्या समर्थकांना केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.