Kolhapur: कोल्हापूर करवीर तालुक्यातील दोनवडे येथे आर्थिक वादातून हॉटेल मालकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. खून झालेल्या मालकाच्याच हॉटेलमध्ये त्याच्या मुलासमोर गावठी कट्ट्यातून गोळी झाडून रात्री साडेनऊच्या सुमारास खून करण्यात आला. चंद्रकांत आबाजी पाटील (रा. दोनवडे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर या घटनेत मुलगा रितेश जखमी झाला असून हल्लेखोर स्वतःहुन करवीर पोलिस ठाण्यात हजर झाले.
संशयित दत्तात्रय कृष्णात पाटील (४०, रा. खुपिरे) आणि सचिन गजानन जाधव (३८, रा. खुपिरे) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, चंद्रकांत पाटील यांचे दोनवडे फाटा येथे ‘गोल्डन हॉटेल, बार व लॉजिंग आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनानंतर हॉटेल व्यवसाय बंद आहे. केवळ लॉजिंग सुरू आहे.
चंद्रकांत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी दत्तात्रय पाटील व सचिन जाधव यांच्याकडे काही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी दिली होती. यामध्ये या दोघांना नुकसान झाले होते. तेव्हापासून चंद्रकांत पाटील व दत्तात्रय पाटील यांच्यामध्ये वाद धुमसत होता. यातून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
शनिवारी सकाळी चंद्रकांत पाटील यांचा मुलगा रितेश हॉटेलमध्ये आला होता. लॉजिंग सुरू असल्याने तो दिवसभर हॉटेलमध्येच थांबून होता. रात्री साडेनऊच्या सुमारास चंद्रकांत पाटील दुचाकीवरून हॉटेलमध्ये आले. यावेळी काही वेळातच संशयित दत्तात्रय पाटील व सचिन जाधव दोघे दुचाकीवरून या हॉटेलमध्ये आले. यावेळी चंद्रकांत पाटील व दत्तात्रय पाटील यांच्यामध्ये वाद सुरू झाला. दोघेही चंद्रकांत यांच्या अंगावर धावून गेले. दोघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
रितेश याने मध्यस्थी करत वडिलांना सोडविण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तो जखमी झाला. याचवेळी दत्तात्रय पाटीलने स्वतःजवळील गावठी कट्टा काढून चंद्रकांत पाटील यांच्यावर रोखून धरत थेट त्यांच्या छातीत गोळी झाडली. अवघ्या क्षणातच चंद्रकांत पाटील खाली कोसळले. तेव्हा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. काही सेकंदांत घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते.
गोळीबारानंतर काही वेळातच सचिन व दत्तात्रयने दुचाकीवरून पळ काढला. यानंतर रितेश याने याची माहिती नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन चंद्रकांत पाटील यांना रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. तत्पूर्वीच चंद्रकांत पाटील यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याबाबतचे काम सुरू होते. घटनास्थळी अप्पर पोलिस उपअधीक्षक निवेश खाटमोडे, पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी भेट दिली.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.