Satara Lok Sabha Election : सातारा लोकसभा मतदारसंघातील (Satara Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी खासदार शरद पवार आज (शुक्रवारी) साताऱ्यात येणार आहेत. यावेळी ते पक्षाच्या दोनशे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधून सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत निर्णय घेणार आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते स्वत:ही सातारा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवारांच्या सातारा दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी उमेदवार निश्चित झाल्याचे सांगत परवा साताऱ्यात शक्तीप्रदर्शन केले होत. तसेच ही निवडणूक कमळ चिन्हावरच लढणार असल्याचेही राजेंनी सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीत सातारची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे खासदार शरद पवार (Sharad Pawar) साताऱ्यातून कोणाची उमेदवारी जाहीर करणार याची उत्सुकता आहे. त्यासाठी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून इच्छुकांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोनशे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी ते सकाळी अकरा वाजता साई सम्राट मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
साताऱ्यातील (Satara) शरद पवारांचा हा दौरा उमेदवार निश्चितीसाठीच असल्याचे मानले जात आहे. सध्या सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून विद्यमान खासदार, श्रीनिवास पाटील, कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सुनील माने, सत्यजित पाटणकर, सारंग पाटील यांची नावे इच्छुकांत आहेत. तर ऐनवेळी क्लिन चेहरा म्हणून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव पुढे येण्याची शक्यता आहे. पण ते लढण्यास इच्छुक नाहीत. अद्याप राष्ट्रवादीतील एकाही इच्छुकाच्या नावावर एकमत झालेले नाही. सर्व इच्छुकांची मते खासदार शरद पवार यांनी यापूर्वीच जाणून घेतली आहेत. आता पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा कौल जाणून घेऊन ते कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे पाहणं महत्वाचं आहे.
आतापर्यंत राष्ट्रवादीच्या (NCP) सर्व आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळेस साताऱ्यातून स्वत: शरद पवारांनी निवडणूक लढावी, अशी आग्रही मागणी मागील तीन ते चार बैठकांमध्ये केली आहे. त्यावेळी पवार यांनी बारामती व माढा मतदारसंघातून (Baramati and Madha constituencies) लढण्यास नकार दिला. पण, साताऱ्याबाबत त्यांनी कोणतीच भूमिका सांगितलेली नाही. कदाचित कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा विचार त्यांच्या मनात सुरु असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते जर रिंगणात उतरले तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते झटून काम करुन पवारांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे आजच्या बैठकीत पुन्हा एकदा शरद पवार यांना साताऱ्यातून लढण्याचा आग्रह कार्यकर्ते करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवारांचा आजचा सातारा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.