सातारा : सातारा पालिकेसह जिल्हयातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढविण्याचा निर्णय महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीच्यावतीने घेण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यासह नागपूर, औरंगाबादसह प्रमुख महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी सहभागी होणार असल्याची माहिती पद्मश्री लक्ष्मण माने यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.
यासंदर्भातील माहिती देताना लक्ष्मण माने म्हणाले, ''१९७४ मध्ये मी साताऱ्यात आलो. या शहराच्या जडणघडण, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक विकासाचा मी साक्षीदार आहे. विविध कारणांमुळे सातारा विकासाच्या प्रक्रियेत मागासच राहिला आहे. विविध कारणांनी जनतेची दिशाभूल करत राजसत्तांनी साताऱ्यातील धनदांडगे बगलबच्चे जवळ करत साताऱ्याची चाळीस वर्षे सत्ता भोगली. विकास, रोजगार नसल्याने सातारकर या राजसत्तांना कंटाळले असून त्यांना सक्षम तिसरा पर्याय देण्यासाठी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी सातारा पालिकेच्या पन्नास जागा ताकतीने लढणार आहे.
जिल्ह्यात पुरोगामी समविचारी पक्षांसोबत जाण्यासही आमची हरकत नाही, जिल्ह्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केवळ पक्षच नव्हे तर मतदारांनाही आम्ही आमची दखल घ्यायला भाग पाडू, असा विश्वासही लक्ष्मण माने यांनी व्यक्त केला. साताऱ्यासह पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद महापालिका क्षेत्रातही महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीचे संघटनात्मक बांधणीचे काम सुरू झाले आहे. आगामी काळात समाजाविषयी प्रेम, कणव असणाऱ्यांना आघाडीच्या वतीने तिकिट देण्यात येईल तसेच निवडणूकीशी निगडीत इतर प्रक्रिया टप्याटप्याने पार पाडण्यात येतील, असेही श्री. माने यांनी यावेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.