Jaykumar Gore : रणजितसिंह निंबाळकरांना कमी लीड; जयकुमार गोरेंचा विधानसभेला घाम निघणार?

Jaykumar Gore News : सत्ता सोबत असताना मोठ्या मताधिक्यासाठी अविरत परिश्रम घेऊनही मोठ्या मताधिक्याचे गणित का फसले? याचा विचार आमदार जयकुमार गोरे यांना करावा लागणार आहे.
ranjitsinh naik nimbalkar | jaykumar gore
ranjitsinh naik nimbalkar | jaykumar goresarkarnama

Satara News, 12 June : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि माण विधानसभा मतदारसंघात संमिश्र प्रतिक्रियांना ऊत आला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते-पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने महाविकास आघाडीचे शिलेदार न्हाऊन निघाले.

तर माण विधानसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( Ranjitsinh naik nimbalkar ) यांना मताधिक्य दिल्याने महायुतीच्या पाठीराख्यांनी पाठ थोपटून घेतली. मात्र, माण तालुक्यातील लोकसभेची मते महाविकास व महायुती या दोघांनाही विचार करायला लावणारी आहेत. ही मते पाहता महाविकास आघाडीसह महायुतीला आत्मपरीक्षणाची गरज आहे.

माढ्यातून राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyasheel Mohite Patil ) यांनी भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा तब्बल सव्वा लाखांच्या फरकाने पराभव केला. काट्याची लढत होईल अशी चर्चा असताना हा मोठा विजय महाविकास आघाडीला बळ देणारा ठरला. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा व माढा या तीन मतदारसंघांनी 'तुतारी'ला भरभक्कम आघाडी दिली. तर माण, फलटण व सांगोला या तीन मतदारसंघातून कमळाने पिछाडी भरुन काढण्याचा केलेला प्रयत्न तोकडा पडला.

माण मतदारसंघातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना 23 हजार 355 एवढे मताधिक्य मिळाले. फक्त माण तालुक्याची आकडेवारी पाहता तालुक्यातून 2 लाख 3 हजार 886 मतदारांपैकी 1 लाख 29 हजार 240 मतदारांनी मतदान केलं. भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना 67 हजार 134 मते तर राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) धैर्यशील मोहिते-पाटील यांना 49 हजार 675 मते मिळाली. माण तालुक्यातून 17 हजार 459 एवढे मताधिक्य भाजपला मिळाले.

ranjitsinh naik nimbalkar | jaykumar gore
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मिशन विधानसभा; साताऱ्यातील 'या' जागांवर उमेदवार देणार?

आमदार जयकुमार गोरे ( Jaykumar Gore ) यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे डॉ. संदीप पोळ, भास्करराव गुंडगे, रासपचे बबन विरकर, मामूशेठ विरकर, आप्पासाहेब पुकळे, राष्ट्रवादीचे (अजित पवार) युवराज सुर्यवंशी व इतर घटक पक्षांच्या सहकाऱ्यांनी मताधिक्यासाठी परिश्रम घेतले. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) प्रभाकर देशमुख व अभयसिंह जगताप, शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते शेखर गोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष  अनिल देसाई, काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख आदी नेत्यांनी एकदिलाने खिंड लढवली.

मात्र, हे सर्वजण एकत्र येवूनही महाविकास आघाडी माण तालुक्यात पिछाडीवर पडली. आमदार जयकुमार गोरे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेतलेले कष्ट, विकासकामांचा दावा, नरेंद्र मोदी यांचा करिष्मा या सर्वांच्या सोबतीला मतांची गोळाबेरीज करताना केलेल्या क्लृप्त्या हे सर्व असून सुध्दा अपेक्षित असलेले मताधिक्य मिळविण्यात त्यांना अपयश आले आहे. तर जनतेतून उठाव असताना, चांगले वातावरण असताना महाविकास आघाडीला या परिस्थितीचा लाभ उठवता आला नाही.

सत्ता सोबत असताना मोठ्या मताधिक्यासाठी अविरत परिश्रम घेऊनही मोठ्या मताधिक्याचे गणित का फसले? याचा विचार आमदार जयकुमार गोरे यांना करावा लागणार आहे. तर मतदारसंघात 'तुतारी'साठी पोषक वातावरण असूनही याचा लाभ आपण का उठवू शकलो नाही, याचे आत्मपरीक्षण महाविकास आघाडीला करावे लागणार आहे.

ranjitsinh naik nimbalkar | jaykumar gore
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मिशन विधानसभा; साताऱ्यातील 'या' जागांवर उमेदवार देणार?

म्हसवड, दहिवडीतून आघाडी -

भाजपला म्हसवड नगरपालिका क्षेत्रात 3 हजार 335 तर दहिवडी नगरपंचायत क्षेत्रात फक्त 415 मतांची आघाडी मिळाली. आंधळी गटात 3 हजार 93 बिदाल गटात 5 हजार 76 मार्डी गटात 555 गोंदवले गटात 2 हजार 53 तर कुकुडवाड गटात 2 हजार 493 मतांची आघाडी मिळाली आहे.

भाजपला प्रथमच खटावमधून आघाडी -

जयकुमार गोरे यांनी माण विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात प्रवेश केल्यापासून खटाव तालुक्यातून नेहमीच त्यांना पिछाडीचा सामना करावा लागला आहे. यावेळी मात्र, ही पिछाडी भरुन काढत साधारण सात हजार मतांची आघाडी घेतली. ही आघाडी खटाव तालुक्यातील नेत्यांसाठी मोठी चपराक ठरली आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com