Prakash Awade
Prakash AwadeSarkarnama

आम्ही काँग्रेसमध्ये होतो, त्यावेळी उंचीचे नेते होते; आता काँग्रेस शोधावी लागते

आमदार प्रकाश आवाडे यांची काँग्रेसवर टीका; महाविकास आघाडी सरकार कधी पडेल हे माहीत नाही, पण पडेल तोपर्यंत हे सरकार आहे, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.
Published on

इचलकरंजी : आम्ही काँग्रेसमध्ये होतो, त्यावेळी त्या उंचीचे नेते होते. देशात इंदिरा गांधी, राजीव गांधी तर राज्यात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरद पवार, सुधाकर नाईक, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांनी केलेले काम आणि त्यांचे योगदान मोठे होते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता नेमके काँग्रेस कुठे आहे, ते सांगावे, असा सवाल उपस्थित करीत आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधी पडेल हे माहीत नाही, पण पडेल तोपर्यंत हे सरकार आहे, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली. (MLA Prakash Awade criticizes Congress)

कोल्हापूर येथील एका प्रचाराच्या कार्यक्रमात आमदार आवाडे यांनी विकास कामांबाबत भाजपचे कौतुक करीत काँग्रेसवर टीका केली होती. याबाबत त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, काही लोकांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास करून, बोलणे चुकीच्या पद्धतीने प्रसारित करुन गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. हे सार्वजनिक जीवनात घडत असते. देशाप्रती प्रेम असणे आवश्यकच आहे. धर्म आणि राष्ट्र यामध्ये राष्ट्रप्रेमाला महत्व आहे. मात्र, कुठेतरी वेगळा प्रश्न तयार करायचे आणि आम्ही काहीतरी पुरोगामी विचाराचे आहोत, धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखवून देण्यासाठी चुकीचे काहीतरी करायचे असा हा वाद आहे.

Prakash Awade
महिलेला आमदारकी झेपणार नाही म्हणता मग चंद्रकांतदादांनी ऑफर का दिली होती?

काश्मिरचे उदाहरण देत असताना जो राष्ट्रप्रेमी आहे, त्याला ३७० कलम हटवल्याचा अभिमान आहे आणि तो वाटायलाचं पाहिजे. यापूर्वी काश्मिरमध्ये दोन झेंडे लावले जात होते. खुलेपणाने तिरंगा फडकावून राष्ट्रगीत म्हणणे आणि ध्वजाला सलामी देण्याचे धाडस तेथे लोक करत नव्हते. मात्र, ३७० कलम हटवल्यानंतर लोक अभिमानाने तिरंग्याला सलामी देत आहेत. भारत मातेचा जयघोष करीत आहेत. ते होणे गरजेचे होते. मात्र ते यापूर्वी झालेले नाही. यापूर्वीही अनेक सरकारे बहुमतात होते. त्यांनी ते केले नाही. मात्र, मोदी आणि अमित शहा यांच्या भाजप सरकारने ते केले म्हणून त्यांचे कौतुक केले. हे काहींना रूचत नाही. रूचत नाही म्हणून मी त्या विचारांपासून बाजूला जाणार नाही. युवापिढी ही केवळ राष्ट्रप्रेम या एकाच विचारावर प्रेरित होऊन कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत सत्यजित कदम यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील, असा विश्वास आवाडे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.

Prakash Awade
आशिष शेलार-प्रसाद लाड ही जोडी खासदार राऊतांचा घाम काढणार

निवडणुकीत कुणीही कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी ते सत्य नाही. त्यामुळे वेगवेगळे पक्ष मोदींना पर्याय ठरू शकतात का, हा दुसरा मुद्दा आहे. मुळात काँग्रेसमध्येच विसंवाद आहे. काँग्रेसचे मुळात आमदार किती आहेत. त्यातील २५ आमदार नाराज आहेत. सध्या असलेल्या मंत्र्यांवर नाराज असलेले आपल्या जिल्ह्यातील दोन आमदार आहेत. आमदार पी. एन.पाटील आणि राजू आवळे हे नाराज असल्याचेही आपण ऐकले आहे. सध्या दंगा करणारे, पळणारे २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमध्ये राहतील का, हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. ज्यांनी या देशात काँग्रेसचे नेतृत्व केले, ते सर्व प्रमुख लोक जी-23 मध्ये आहेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे ते द्यायला कोण तयार नाहीत, अशी टीकेची झोड आवाडे यांनी काँग्रेसवर उठवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com