कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Kdcc Bank Election) निवडणुकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. यड्रावकर हे अपक्ष आमदार असले तरी शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झाले आहेत. मात्र, त्यानंतरही ते बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीसोबत (NCP) गेले. यावरून शिवसेनेत (Shiv Sena) मोठी नाराजी होती. आता निवडणुकीनंतर ही नाराजी दूर झाल्याचे संकेत खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी दिले आहेत.
खासदार मंडलिक हेही बँकेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. विजयानंतर बोलताना मंडलिक म्हणाले, नेत्यांनी आम्हाला नाकारलं असलं तरी मतदाराने आम्हाला स्वीकारले आहे. सद्या सतारुढ कडून विजयी झालेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिवसेनेचे आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेत ते शिवसेने सोबतच राहतील. त्यामुळे जिल्हा बँकेच्या आत्तापर्यंतच्या निकालामध्ये आपण स्वतः, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, प्रा. अर्जुन आबिटकर हे आपल्या आघाडीतून विजयी झाले आहेत. याशिवाय अपक्ष रणवीरसिंह गायकवाड की विरोधी आघाडी सोबत येतील, असा विश्वास मंडलिक यांनी व्यक्त केला.
खासदार मंडलिक म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व इतर मित्र पक्ष मिळून जिल्हा बँकेत पॅनेल असावे अशी आमची इच्छा होती. पण तसं काही झालं नाही आणि त्यांनी आम्हाला पण निवडणुकीत जनतेने आमचा स्वीकार केला आहे. त्यामुळे आमचे विजय सर्व उमेदवार ताठ मानेने जिल्हा बँकेचा कारभार करतील असेही मंडलिक यांनी सांगितले. मंडलिक यांच्या यड्रावकरांविषयीच्या वक्तव्यामुळे सत्तारूढ गटात चलबिचल सुरू झाली आहे. यड्रावकर यांच्याकडून मात्र अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, सर्वाधिक चुरस ही शिरोळ तालुका विकास संस्था गटातील उमेदवार राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्यात होती. माजी खासदार राजू शेट्टी हे स्वत: पाटील यांचे मतदान प्रतिनिधी म्हणून केंद्रात उपस्थित होते, त्यामुळे या लढतीकडे कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे; तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राजेंद्र यड्रावकर यांना 98 मते मिळाली, तर गणपतराव पाटील यांना 52 मते पडली.
भाजपचा (BJP) पाठिंबा असलेले आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांना पराभवाचा धक्का बसला आहे. नागरी सहकारी पतसंस्था गटातून शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांचे भाऊ प्रा. अर्जुन आबिटकर (Arjun Abitkar) विजयी झाले आहेत. त्यांनी 614 मते मिळवत आवाडेंचा पराभव केला. आवाडे हे भाजप कडून उमेदवार म्हणून सत्तारूढ आघाडीच्या पॅनेलमध्ये होते. त्यांना 461 मते मिळाली तर तिसरे उमेदवार अनिल पाटील यांना 160 मते मिळाली. या गटात धक्कादायक निकाल लागण्याची चर्चा एक दिवस अगोदरच रंगली होती. त्यानुसार मतदारांनीही कौल दिल्याचे दिसून आले. आवाडे यांचा पराभव करत आबिटकर हे जायंट किलर ठरले आहेत.
पन्हाळा सेवा संस्था गटातून आमदार विनय कोरे (Vinay Kore) विजयी झाले आहेत. त्यांना 243 पैकी 204 मते मिळाली. तर शाहूवाडी व आजरा येथे दोन विद्यमान संचालकांना पराभवाचा सामना करावा लागल्याने सत्तारुढ गटाला धक्का बसला आहे. प्रक्रिया गटातून विरोधी गटाचे खासदार संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, विकास संस्था गटात गडहिंग्लज तालुक्यातून विद्यमान संचालक संतोष पाटील, भुदरगडमधून विद्ममान संचालक व माजी आमदार के. पी. पाटील यांचे पुत्र रणजितसिंह पाटील, आजरातून सुधीर देसाई, शाहुवाडीतून रणवीरसिंह गायकवाड या सत्तारूढ गटाचे चार उमेदवार विजयी झाले. शाहुवाडीतून विद्ममान संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर तर आजऱ्यातून विद्यमान संचालक अशोक चराटी यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
भुदरगड विकास संस्था गटात रणजित पाटील यांना 144 तर त्यांचे विरोधक यशवंत नांदेकर यांना 62 मते मिळाली. शाहुवाडी विकास संस्था गटात रणवीर गायकवाड यांना 66 तर संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर यांना 32 मते मिळाली. गडहिंग्लज विकास संस्था गटात 106 पैकी तब्बल 100 मते घेऊन संचालक संतोष पाटील यांनी सलग दुसऱ्यांना या तालुक्यातून जिल्हा बँकेत प्रवेश केला. यातील सुधीर देसाई, रणवीर गायकवाड हे पहिल्यांदाच बँकेत आले आहेत. देसाई यांचे वडील दिवंगत राजाराम देसाई यांनी बँकेचे अध्यक्ष पद भूषवले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.