Nagar News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल, याची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. आमदार रोहित पवार यांनी राज्यात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत काल झालेल्या बैठकीत आमदार प्राजक्त तनपुरे आणि प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रतापराव ढाकणे यांची नावे चर्चेत आली आहेत. या दोनव्यतिरिक्त तिसरे नावदेखील चर्चेत असून, तेच लोकसभेला निवडणुकीच्या रिंगणात असेल, असे सांगितले जात आहे. ते तिसरे नाव आमदार नीलेश लंके यांचे असल्याचे सांगितले जात आहे. आमदार लंके हे अजित पवार गटात गेले असले, तरी त्यांच्या नावाची चर्चा पुन्हा लोकसभेसाठी होऊ लागली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक झाली. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार श्रीनिवास पाटील, एकनाथ खडसे, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, प्राजक्त तनपुरे, शशिकांत शिंदे, संदीप क्षीरसागर, हेमंट टकले, रवींद्र पवार, अदिती नलावडे, राखी जाधव, रोहिणी खडसे, महेबूब शेख हे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
ईशान्य मुंबई, भिवंडी, दिंडोरी, माढा, कोल्हापूर, नगर, सातारा, बीड, हिंगोली आणि जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारावर जोरदार चर्चा झाली. आमदार रोहित पवार यांनी राज्यात राहण्याचे ठरवले आहे. तसे शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे त्यांचे लोकसभा निवडणुकीसाठी नाव सध्या तरी मागे पडले आहे. नगर दक्षिणसाठी आता आमदार प्राजक्त तनपुरे आणि प्रतापराव ढाकणे यांचे नाव चर्चेत आले आहे.
आमदार प्राजक्त तनपुरे हे नगर जिल्ह्याचे प्रभारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी येथील अधिवेशनाची धुरा यांनी सांभाळली होती. अधिवेशन यशस्वी झाले. त्यामुळे त्यांचे कौतुक पक्षाकडून होत आहे. याशिवाय त्यांचा राहुरी मतदारसंघासह नगर जिल्ह्यात जनसंपर्क वाढत आहे. तरुण नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहे.
पक्षाच्या आदेशाप्रमाणे त्यांचे कामकाज आहे. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले आहे. आमदार तनपुरे यांच्यापाठोपाठ ढाकणे यांचे नावदेखील चर्चेत आले आहे. प्रतापराव ढाकणेदेखील आक्रमक आणि तरुण चेहरा ठरेल, असे सांगितले जात आहे. याशिवाय राजेंद्र फाळके यांचेदेखील नाव चर्चेत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या बैठकीत सुरुवातीपासून तिसरा चेहरा चर्चेत आहे, तो म्हणजे आमदार नीलेश लंके यांचा! आमदार नीलेश लंके हे अजित पवार गटात सामील झाले आहेत. परंतु लोकसभेसाठी शरद पवार यांच्याकडून तोच चेहरा निर्णायक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. ऐनवेळी तोच चेहरा निवडणुकीच्या रिंगणात असेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या निवडणुकीत कोणता चेहरा असेल, यावर बरीच चर्चा सुरू आहे.
आमदार लंके यांची क्रेझ अजून आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात त्यांचा दांडगा संपर्क आहे. राष्ट्रवादी फुटीअगोदर त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. खासदार सुजय विखे यांच्यासमोर आमदार लंके यांनी आव्हानदेखील उभे केले होते. परंतु पुढे राजकीय गणिते वेगळी झाली आणि राष्ट्रवादी फुटीनंतर आमदार लंके हे अजित पवार गटात सामील झाले. असे असले, तरी आमदार लंके आजही शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्याशी संपर्क ठेवून असल्याचे सांगितले जात आहे.
आमदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी यांनीदेखील लोकसभेच्या निवडणुकीची तयारी केली आहे. त्यांनी नगर दक्षिणेत शिवस्वराज्ययात्रा काढली आहे. त्याची सुरुवात पाथर्डीतून केली आहे. ही यात्रा सुरू करण्यामागे आमदार लंके यांचीच लोकसभेची चाचपणी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नगर दक्षिणेत खासदार विखेंविरुद्ध आमदार लंके यांच्यातच सामना रंगणार, असे भविष्य वर्तवले जात आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.