अहमदनगर - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्ह्यातील मिनी मंत्रालय समजले जात असलेल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला. निवडणुकीत अखेरचे लक्ष्य विजय आणि सत्ता हेच असते. राज्यात तीन पक्षांची महाविकास आघाडी सत्तेवर आहे. मात्र, स्थानिक पातळीवर गणिते वेगळी असतात. त्यामुळे राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीची बिघाडी झाली. गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने ऐन वेळी भाजपसोबत सत्ता स्थापन केली, हे ताजे उदाहरण. अशीच पुनरावृत्ती नगरला झाली तर त्यात नवल कसले? ( Nagar Zilla Parishad lead, breakdown, or struggle for power? )
जिल्हा परिषदेतील सदस्यत्व हे विधानसभेचे प्रवेशद्वार असते. या विजयातून विधानसभेची स्वप्ने पडू लागतात. तसेच, आमदार होऊ इच्छिणाऱ्यांना झेडपीचे हे ‘द्वारपाल’ आपल्या हातात हवे असतात. केंद्र सरकारने बहुतेक निधी भलेही थेट ग्रामपंचायतींना वर्ग केला असला, तरी झेडपी सदस्यांचे महत्त्व कमी झालेले नाही. हीच स्थिती पंचायत समित्यांची. अनेक प्रकारच्या निधीला कात्री लागली. हातात खूपसा विकासनिधी नसतो, तरीही निवडणुकीचे डफडे वाजताच बहुतेकांच्या अंगात येते. नगर जिल्हा तर राजकारणाच्या बाबतीत ‘हाय सेन्सिटिव्ह’.
मतदान होईपर्यंत अनेक सरपंच गावांत दिसणार नाहीत, की सेवा संस्थांच्या सदस्यांचे पाय घराला लागणार नाहीत. आता निवडणूकप्रक्रिया सुरू झाली आहे. प्रारूप यादी तयार होत आहे. निवडणुकीची तारीखही जाहीर होईल. साहजिकच, कार्यकर्ते शड्डू ठोकून मैदानात उतरणार आहेत.
राजकीय पक्ष लागले कामाला
जिल्ह्यात आपल्याच पक्षाच्या जागा जास्त येऊन जिल्हा परिषदेची सत्ता हाती यावी, यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांपैकी कोणाच्या जागा जास्त येतात, त्यावरून तो पक्ष अध्यक्षपदाचा दावेदार होईल. तसेच निकालानंतरही भाजप कोणाची फोडाफोडी करेल, याचा नेम नाही. या पार्श्वभूमीवर आगामी काळात भलेही महाविकास आघाडीचा एकत्र लढण्याचा आदेश निघाला, तरीही एकेक जागा जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष ताकद पणाला लावील. फोडाफोडी होईल, यात शंका नाही.
शिवसेनेने तर या निवडणुकीची तयारी म्हणून गट-गणनिहाय दौरे सुरू करण्याचे नियोजन केले आहे. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या खांद्यावर या निवडणुकीची मोठी धुरा असेल. त्याचाच भाग म्हणून या महिनाअखेरीस गटनिहाय दौरे आखले जात आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह दिग्गज या निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देणार आहेत. साई संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, आमदार नीलेश लंके, आमदार संग्राम जगताप, आमदार रोहित पवार, डॉ. किरण लहामटे हे आपले गड शाबूत राखण्याकरिता झेडपीसाठी दमदार उमेदवार देतील.
काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार लहू कानडे कॉँग्रेसच्या जागा वाढविण्यासाठी प्रयत्न करतील, तर भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, तसेच आमदार मोनिका राजळे यांनी यापूर्वीच जिल्हा परिषदेसाठी या पक्षाच्या झेडपीमध्ये जास्त जागा वाढण्यासाठी बांधणी केलेली दिसते. मनसे, रिपाइंदेखील ताकद अजमाविण्याचा प्रयत्न करेल.
सत्तेसाठी सर्व काही
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्रित लढण्याचे ठरविले, तरीही स्थानिक पातळीवर कार्यकर्ते किती निष्ठेने काम करतील, हे काळच ठरविणार आहे. 2017 च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 19, कॉँग्रेसच्या 23, तर शिवसेनेच्या सात जागा होत्या. नंतर त्यात फुटाफुटी झाली, हा भाग वेगळा. असे असताना राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली होती. भाजपला केवळ 14 जागांवर समाधान मानावे लागले होते. तथापि, या वेळी मात्र विखे पिता-पुत्र जोरदार तयारी करून आहेत, असे चित्र आहे. त्यामुळे कोणाच्या कितीही जागा आल्या, तरीही सत्तेसाठी सर्व काही, याचे प्रत्यंतर या निवडणुकीत दिसून येईल.
गट-गण वाढल्याने संधी
2017 च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे 73 गट, तर पंचायत समितीचे 146 गण होते. त्यांत आता नव्याने 12 गटांची, तसेच 24 गणांची भर पडली. या निवडणुकीत एकूण 85 गट, तर पंचायत समितीचे 170 गण झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सूचना व हरकती येतील. 20 मार्चला सदस्यांची मुदत संपल्याने जिल्हा परिषदेवर सध्या प्रशासक आहे. त्यामुळे तयारीला जुन्या सदस्यांनाही चांगला वेळ मिळाला आहे. तसेच, जास्त गट-गण तयार झाल्याने तरुणांना संधी मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.