
पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी ( ता. 14 ) मतदान प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस व महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष (मगो) यांच्यात प्रमुख लढत आहे. भाजपच्या प्रचाराची धुरा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यावर आहे. त्यांच्याशी 'साम मराठी'ने संवाद साधला. या वेळी त्यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर टीका केली. ( Nana Patole is a tourist from Goa )
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच गोव्यात सभा झाली. पंतप्रधान मोदी यांची ज्या वेळी सभा होते. त्यावेळी मोठी लाट येते, असा आमचा अनुभव आहे. त्याचा शेवटच्या टप्प्यात आम्हाला फायदा मिळतो. मी जे गोव्यात पाहतो आहे की, आमचे निश्चित गोव्यात सरकार येईल. काही ठिकाणी चुरशीच्या लढती आहेत मात्र भाजपचा बालेकिल्ला असलेल्या भागांत आमचे निश्चित उमेदवार निवडून येतील. भाजप एकटा 21 जागा जिंकत बहुमत मिळवेल, असे भाकीतही त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसची विश्वासार्थता येथे कमी झाली आहे. काँग्रेस फक्त गटबंधनच्या जोरावर निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करत आहे. आम आदमी पार्टी ( आप ), तृणमुल काँग्रेस यांना लोकांनी गोव्यात स्वीकारलेय, अशी स्थिती नाही. मगो हे तृणमुल काँग्रेस सोबत गेल्याने त्यांच्या मतदारांत नाराजी आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर तृणमुलची हिंदू विरोधी प्रतिमा गोव्यात तयार झाली आहे. त्याचा फटका मगो पक्षाला बसत आहे. अशा परिस्थितीत भाजपने चांगले काम केले आहे. मोदींवर गोव्यातील लोकांचा विश्वास फार आहे. त्याचा फायदा आम्हाला मिळेल. मोदींसोबत काम करेल असे सरकार गोव्यातील लोकांना हवे आहे. 22 प्लस असा आमचा नारा आहे.
भाजपमध्ये बाहेरच्या पक्षातून 7 ते 8 लोक घेण्यात आले आहेत. हे खरे आहे. मागील वेळी विशिष्ट परिस्थिती तयार झाली त्यात आम्ही सरकार तयार केलं. त्यावेळी दुसऱ्या पक्षातले काही लोक आमच्या बरोबर आले. त्यांच्या भरोश्यावर सरकार स्थिरावले. त्यांना आपण बाहेर जा, असे म्हणू शकत नाही. ते निवडणुकीच्या वेळी पक्षात आलेले नाहीत. ते तीन वर्षांपासून भाजपचे आमदार आहेत. त्यांनाच तिकीटे दिलेली आहेत. कोणत्याही निवडणुकीत पक्षातले काही लोक नाराज असतातच. भाजप व संघाचे 99 टक्के लोक आमच्या बरोबर काम करत आहेत. एखादा टक्का नाराज असतील. मनोहर पर्रिकर यांच्या सारखे भाजप व संघाचे व्यक्ती असूनही त्यावेळी काही जणांनी बंडखोरी केलीच होती. मोदींच्या आजच्या सभेला गर्दी झाली होती. ती पाहता जुने लोक आमच्या बरोबरच आहेत हे स्पष्ट आहे.
भाजपच्या प्रमोद सावंतांना नाना पटोले यांनी प्रॉपर्टी सावंत असे म्हंटले होते. यावर फडणवीसांनी सांगितले की, नाना पटोले जे म्हणतात त्याला महत्त्व नाही. सावंतांना गोव्यातील माणूस तसे म्हणत नाही. नाना पटोले हे गोव्यात पर्यटनासाठी आले आहेत. त्यांचा गोव्याशी काहीही संबंध नाही. निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक पक्ष महाराष्ट्रातील कोणत्या तरी नेत्याला गोव्यात पाठवत असतो. काँग्रेसने त्यांना पाठविले. गोव्यातील राजकारणाचे त्यांना 10 टक्केही माहिती नाही. त्यांनी कोणाला तरी विचारले असेल की प्रमोद सावंतांवर आपण काय आरोप लावू शकतो. त्यांना सांगणाऱ्याने शाहनिशा करायला हवी होती, की असा जाहीर आरोप कुठे तरी लागला आहे का?, असा एखादा कागद आला आहे का?
मागील वेळी आम्ही संख्याबळात पराभूत झालो होतो. गोव्यात सर्वाधिक मते भाजपला मिळाली होती तर सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. आमच्या काही जागा थोड्या मतांनी गेल्या होत्या. मागील वेळी झालेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्पल पर्रिकर, लक्ष्मीकांत पार्सेकर हे आमच्या परिवारातील आहेत ते बाहेर गेल्याचे आम्हाला दुःख आहे. मात्र उत्पल पर्रिकरांना दोन-तीन पर्याय दिले होते. भाजपचा बालेकिल्ला असलेला मतदार संघ देत होतो. शिवाज पाच वर्षांनी पुन्हा पणजी मतदार संघ देण्याचे सांगितले होते. पणजीतून निवडून आलेले दुसऱ्या पक्षातील व्यक्ती आमच्या बरोबर आहेत. त्यांना सोडणे आता शक्य नाही. त्यांच्या आजू-बाजूच्या लोकांनी त्यांच्या डोक्यात वेगळे घातले. ते स्वतंत्र निवडणूक लढत असल्याचे आम्हाला दुःख आहे.
लक्ष्मीकांत पार्सेकर हे सुरवातीपासून भाजप बरोबर होते. त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत भाजपने विविध ठिकाणी काम करण्याची संधी दिली. मुख्यमंत्री असतानाही ते निवडणूक हारले. सर्वे पाहिल्यावर आमच्या लक्षात आले की ते निवडून येणार नाहीत. आम्ही त्यांना समजून सांगितले. मी स्वतः त्यांना वरिष्ठ नेत्यांकडे घेऊन गेलो. तुमच्या सारखा ज्येष्ठ व्यक्ती आम्हाला हवा आहे. तुम्हाला केंद्रात, राज्यात कुठेही सामावून घेऊ असे सांगितले मात्र त्यांचा आग्रह निवडणूक लढविण्याचा होता. अखेर पक्षाला कठोर निर्णय घ्यावे लागतात.
पार्सेकरांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, पार्सेकर मोठे आहेत. मोठ्या माणसांनी अशी आव्हाने द्यायची नसतात. राजकारणात अशी आव्हाने देऊन माणसाला शेवटी खाली पहायची वेळ येते. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र ते निवडून येणार नाहीत, असा टोलाही त्यांनी पार्सेकरांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.