सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी कोरेगाव व खटाव सोसायटीची जागा वगळून अंतिम करण्यात आली. पण, जागा वाटपात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले चार जागांवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बैठक घेऊन अंतिम निर्णय केला जाणार आहे. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार शोधला आहे. त्यामुळे गृहनिर्माण आणि दुग्धविकास मतदारसंघातून निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांची महत्वपूर्ण व तातडीची बैठक काल (शनिवारी) पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार शशीकांत शिंदे, मकरंद पाटील, विक्रमसिंह पाटणकर तसेच भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँकेच्या सर्व मतदारसंघावर इच्छुक उमेदवारनिहाय चर्चा करण्यात आली. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे चार जागांच्या मागणीवर ठाम राहिले. उद्या (सोमवारी) राष्ट्रवादीचे सर्व इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.
शिवेंद्रसिंहराजेंकडे जिल्हा बँकेतील २२ टक्के मते असल्याने त्यांनी सातारा सोसायटीसह आणखी चार जागा हव्या आहेत. तर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनाही कराड सोसायटीसह चार जागा हव्या आहेत. त्यामुळे दोघांच्या मागणीवर अर्ज दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार तोडगा काढणार आहेत. सोसायटीच्या खटाव व कोरेगाव मतदारसंघात वाद निर्माण झाल्याने येथील निर्णय नंतर घेतला जाणार आहे. पण खटावमधून नंदकुमार मोरे आणि इंदिरा प्रभाकर घार्गे तसेच कोरेगावातून सुनील माने व कांतीलाल पाटील हे इच्छुक आहेत. कोरेगावातून सुनील माने यांना विरोध झाला आहे. तर खटावमधून नंदकुमार मोरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
खासदार उदयनराजेंच्याविरोधात राष्ट्रवादीने उमेदवार शोधला आहे. त्याचे नाव मात्र, गुलदस्त्यात असून सोमवारी अर्ज दाखल केल्यानंतरच त्याचे नावे स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे खासदार उदयनराजेंना निवडणूक सोपी जाणार नसल्याचे चित्र आहे. जावळी सोसायटी मतदारसंघातून शशीकांत शिंदेंच्या विरोधात ज्ञानदेव रांजणे व दीपक पवार यांचे अर्ज आहेत. यातील श्री. रांजणे यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले जाणार आहे. त्यासाठीची जबाबदारी शिवेंद्रसिंहराजेंवर सोपवण्यात आली आहे. तसेच बँका व पतसंस्था मतदारसंघ व औद्योगिक, विणकर आणि मजूर संस्था मतदारसंघावर सहकारमंत्री तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी दावा केल्याने त्यांच्यापैकी कोणाच्या वाटणीला हा मतदारसंघ येणार त्यावर उमेदवार दिला जाणार आहे. तसेच राखीव जागांबाबतही उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
राष्ट्रवादीची संभाव्य यादी अशी : सोसायटी मतदारसंघ- कराड सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, फलटण सभापती रामराजे नाईक निंबाळकर, जावळी आमदार शशीकांत शिंदे, पाटण विक्रमसिंह पाटणकर, वाई नितीन पाटील, माण मनोज पोळ, खंडाळा दत्तानाना ढमाळ, महाबळेश्वर राजेंद्र राजपुरे, सातारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले. खरेदी विक्री संघ ः आमदार मकरंद पाटील, कृषी प्रक्रिया मतदारसंघ शिवरूपराजे खर्डेकर.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.