अहमदनगर - चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सव कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व नेते उपस्थित होते. या उत्सवात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांना निमंत्रित केले नाही. तर भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी चौंडीत येण्यापासून थांबविले. जयंती उत्सव कार्यक्रम झाल्यावर पडळकर व खोत यांच्या वाहनांना चौंडीच्या दिशेने सोडले आहे. ( Padalkar, Khot's convoy of vehicles left: a meeting will be held in Choundi )
चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रम करण्याची परवानगी गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस प्रशासनाला मागितली होती. मात्र पोलिस प्रशासनाने ही परवानगी नाकारली होती. तरीही पडळकर हे सदाभाऊ खोत यांच्या बरोबर आज चौंडीच्या दिशेने निघाले होते. त्यांची वाहने कर्जतवरून चापडगावच्या कमानीजवळ येताच पोलिसांनी या वाहनांच्या ताफ्याला अडविले.
संतप्त झालेल्या पडळकर समर्थकांनी शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान चौंडीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला शरद पवार, रोहित पवार, मंत्री धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दत्ता भरणे, आमदार नीलेश लंके, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आदी उपस्थित होते. जयंती उत्सवाचा कार्यक्रम संपताच पडळकरांच्या वाहनांचा ताफा पोलिसांनी सोडून दिला आहे.
पडळकर व सदाभाऊ खोत चौंडीत येत असल्याचे समजताच भाजपचे कार्यकर्ते व राम शिंदे यांचे समर्थक मोठ्या संख्येत चौंडीत जमू लागले आहेत. या भाजप कार्यकर्त्यांकडून चौंडीत सभा घेण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे पडळकर व खोत चौंडीत येताच चौंडीत सभा होणार असल्याचे समजते. या सभेला राम शिंदेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सभेत भाजपचे नेते काय बोलणार यावर जिल्हाभर चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.