Prabhakar Gharge: उरमोडीचे पाणी २००७ मध्येच खटाव तालुक्यात आले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच उरमोडीचे पाणी माण तालुक्यात आले आहे. शरद पवार यांच्यामुळेच सातारा जिल्ह्याचे पाणी लवादातून वाचले आहे.
नाहीतर ते कर्नाटकला गेले असते. आमदारांनी पाण्याचे राजकारण करून पंधरा वर्ष जनतेला फसवले; पण जनता आता अशा भूलथापांना बळी पडणार नाही, असा टोला माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी दिला.
माण तालुक्याच्या विविध गावांतील प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, शेतकरी संघटनेचे बाबासाहेब देशमुख व महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
या वेळी घार्गे म्हणाले, ‘‘आम्ही कारखाना उभा केला, उद्योग उभारले. त्याद्वारे तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. गेल्या पंधरा वर्षांत माणच्या आमदारांनी माण- खटावची संस्कृती बिघडवण्याशिवाय काय काम केले, हे विचारण्याची वेळ आता आली आहे. माण खटावला पाणी मिळण्यापूर्वी ते अगोदर आरक्षित करणे गरजेचे होते.
शरद पवार यांनीच जिल्ह्याचे हक्काचे पाणी कर्नाटकला जाऊ नये म्हणून लवादासमोर योग्य भूमिका मांडली. त्यातून उरमोडीचे धरण आणि योजना व त्यानंतर जिहे- कठापूर योजना पूर्ण होऊ शकल्या.
उरमोडीचे पाणी तर २००७ मध्येच खटाव तालुक्यात कोंबडवाडी व वडी येथे आले. तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्तेच ते पाणी खटाव तालुक्यात सोडण्यात आले. त्यापुढची उरमोडीची कामे ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच पूर्ण होऊन हे पाणी माण व खटाव तालुक्यांत आले आहे.’’
पाणी प्रश्न सोडविण्याचे श्रेय सर्वांचे आहे. त्यामुळे आमदार गोरे यांनी मीच पाणी आणले असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल थांबवावी, असेही घार्गे म्हणाले.
या वेळी प्रभाकर देशमुख, अनिल देसाई यांनी माण व खटाव तालुक्यांतील जनतेतही राज्याप्रमाणेच उद्रेकाची भावना दिसत आहे. त्यामुळे प्रभाकर घार्गे यांना मतदान करून परिवर्तन करावे, असे आवाहन केले. या वेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, प्रा. खाडे, रूपाली ओंबासे यांनी मनोगत व्यक्त केले.
घार्गे म्हणाले-
१) साखर कारखान्याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक
२) दुष्काळी भागातील कारखाना असूनही सर्वांच्या बरोबरीने दर
३) अनेक उद्योग समूहाद्वारे रोजगार व नोकऱ्यांची उपलब्धता केली
४) जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम करताना ५४ छावण्यांची उभारणी
५) सहकाराच्या माध्यमातून शेकडो उद्योजक घडवले.
६) माण व खटाव तालुक्यांतील दुष्काळी जनतेला न्याय दिला.
७) तुम्ही मात्र संस्कृती बिघडवण्याचे पाप केले.
८) गावागावांत भांडणे लावून आता स्वार्थासाठी भाऊ एकत्र आलात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.