Prajakt Tanpure : पीक विमा कंपनीच्या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांच्या नेतृत्वाखाली आज (शनिवारी) सायंकाळी थेट राहुरी पोलीस ठाणे गाठले. पीक विमा कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार देऊन, संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक-दीड हजार रुपयात बोळवण थांबवा. नुकसानीच्या पंचनाम्याप्रमाणे पीक विम्याची रक्कम मिळावी. अन्यथा, पीक विमा कंपनी विरुद्ध फसवणूक झालेले शेतकरी गुन्हे दाखल करतील. असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शुक्रवारी (ता. २१) तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकरी व पीक विमा प्रतिनिधी, अधिकारी यांच्या बैठकीत दिला होता.
परंतु, पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे धोरण चालू ठेवल्याने आज शनिवारी (ता. २९) सायंकाळी संतप्त शेतकऱ्यांनी आमदार तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलीस ठाणे गाठले. एचडीएफसी इरगो विमा कंपनीचे अधिकारी रामचंद्र दराडे पोलीस ठाण्यात उपस्थित होते. तेरा शेतकऱ्यांनी विमा कंपनी विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निवेदन दिले.
त्यात म्हंटले की, "एचडीएफसी इरगो विमा कंपनीकडे पीक विम्याचा हप्ता भरला होता. आमच्या पीकाची सुमारे ७० टक्के नुकसान झाल्याचे पंचनामे कंपनीच्या प्रतिनिधीने आमच्या शेतावर येऊन केले होते. परंतु, आम्हास त्या प्रमाणात नुकसान भरपाई न मिळता तुटपुंजी रक्कम देण्यात आली. काही प्रकरणांमध्ये आम्ही भरलेल्या प्रीमियम पेक्षा देखील कमी रक्कम आम्हाला मिळाली. त्यामुळे, कंपनीने फसवणूक केल्याची आमची धारणा झाली आहे. याची योग्य दखल घेऊन, संबंधितांवर गुन्हे दाखल करून आम्हाला न्याय द्यावा."
निवेदनावर सचिन वराळे, गोरक्षनाथ वराळे (दोघेही रा. राहुरी), राजेंद्र म्हसे, संदीप झुगे, सुभाष काळे, अर्जुन वने, सतीश म्हसे, गणेश कैलास झुगे (सर्वजण रा. आरडगाव), अक्षय वने, वसंत जाधव (दोघेही रा. मानोरी), सचिन पानसंबळ (रा. सडे), संदीप कदम, संदीप लगे (दोघेही रा. येवले आखाडा) आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
"पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींनी बांधावर येऊन ७०-८० टक्के नुकसानीचे पंचनामे केले. प्रत्यक्षात सात-आठ टक्के नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली. वास्तविक, ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी आहे. विमा कंपनीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी बांधावरील पंचनाम्याचे आकडे बदलून, घोर फसवणूक केली. पंचनाम्याप्रमाणे अनुज्ञेय रक्कम शेतकऱ्यांना मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही."
- आमदार प्राजक्त तनपुरे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.