
पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नागरी कामांमध्ये खराब कामगिरीबद्दल सहाय्यक आयुक्तांना इशारा दिला आहे.
स्वच्छता, अतिक्रमण हटवणे, बेकायदेशीर फ्लेक्स आणि ड्रेनेज देखभालीतील निष्काळजीपणामुळे त्यांचा संताप वाढला आहे.
सुधारणा न करणाऱ्या अधिकाऱ्यांना लवकरच बदल्या आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.
पुणे : ब्रिजमोहन पाटील
पुणे महापालिकेच्या कामात शिस्त आणण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम कामाला लागलेले आहेत. त्याचा सर्वाधिक दणका क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांना बसण्याची शक्यता आहे. सहाय्यक आयुक्तांकडे अधिकार, यंत्रणा असतानाही स्वच्छता, अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्स, रस्ते, सांडपाणी अशा पायाभूत सुविधा सुधारण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कामात सुधारणा न केल्यास सहाय्यक आयुक्तांची उचबांगडीसह अन्य कारवाईही करण्याचे संकेत आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. यामुळे आता महापालिकेच्या वर्तुळात अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
पुणे महापालिकेवर गेल्या साडेतीन वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून प्रशासकाच्या हाती कारभार आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरसेवक नाहीत, माजी नगरसेवकांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे नागरिक, राजकीय पदाधिकारी समस्या घेऊन गेल्यानंतर त्यांची काम होत नाहीत, ही ओरड कायमच आहे. त्याचप्रमाणे प्रशासकराजमध्ये कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीचा मुद्दाही गंभीर झाला आहे. कामाची पाहणी करण्यासाठी म्हणून अनेक जण कामावर उशिरा येणे, कार्यालयातून लवकर निघून जाणे असे प्रकार घडत आहेत. याचा विपरीत परिणाम शहरावर होत आहे.
प्रभाग स्तरावरील कचरा न उचलणे, रस्त्याचे झाडणकाम न करणे, सांडपाणी वाहिनीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणे, गल्लीबोळातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणे, अतिक्रमण व अनधिकृत, फ्लेक्स यांच्यावर कारवाई न करता त्यांना अभय देणे असे प्रकार घडत आहेत. क्षेत्रीय कार्यालयात या प्रत्येक समस्येवर काम करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध आहेत. तरीही केवळ दिखाऊ कारवाई केली जात आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील समस्यांनी उग्र स्वरूप धारण केले आहे.
पंतप्रधान कार्यालयातून बदली होऊन पुणे महापालिकेत आलेले नवल किशोर राम यांनी आयुक्तपदाचा कार्यभार घेऊन चार महिने पूर्ण झाले आहेत. या काळात त्यांनी महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेताना त्यांना प्रशासनात अनेक त्रुटी दिसून आलेल्या आहेत. अधिकाऱ्यांना कामात सुधारणा करण्याच्या, चुका दुरुस्त करण्याच्या अनेकदा सांगितले आहे. पण त्यात सुधारणा झालेली दिसून येत नाही.
दुसरीकडे महापालिका आयुक्त कार्यालयात नागरिक छोट्या छोट्या समस्या घेऊन येत आहेत. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नागरिकांची कामे होत नाहीत, त्यांचे कोणी म्हणणे ऐकून घेत नसल्याने हे नागरिक थेट आयुक्तांना येऊन भेटत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामातील फोलपण स्पष्टपणे जाणवत आहे.
गेल्या आठवड्यात आयुक्तांनी वाघोली, मांजरी, शेवाळवाडी यासह वडारवाडी, जनवाडी या भागात पाहणी केली. त्यावेळी त्यांना अस्वच्छता, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, जागोजागी पडलेला कचरा हे दृष्ट दिसले. तसेच स्थानिक नागरिकांच्या रोषही आयुक्तांना सहन करावा लागला. यामुळे आयुक्तांनी नगर रस्ता-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांसह दोन अभियंत्यांची बदली केली.
त्यानंतर हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांची बदली केली. तर शाखा अभियंता, आरोग्य निरीक्षक, मुकादम यांचे निलंबन केले आहे. अन्य एका कारवाईत घोले रस्ता शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांसह चौघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आयुक्तांकडे सहाय्यक आयुक्तांच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्याच प्रमाणे महापालिका भवनातील काही विभाग प्रमुख, उपायुक्तांच्याही तक्रारी आलेल्या आहेत. त्यांच्या कामात सुधारणा न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त राम यांनी ‘‘काम करा अन्यथा घरी जा’ अशा इशारा दिल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
1. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कोणाला इशारा दिला आहे?
→ त्यांनी सहाय्यक आयुक्तांना त्यांच्या कामातील दुर्लक्षाबाबत कडक इशारा दिला आहे.
2. कोणत्या कामांमध्ये दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे?
→ स्वच्छता, अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्स, रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थापन या कामांमध्ये दुर्लक्ष आढळले आहे.
3. आयुक्तांनी कोणती कारवाई करण्याचा इशारा दिला आहे?
→ सुधारणा न केल्यास सहाय्यक आयुक्तांची बदली आणि अन्य प्रशासकीय कारवाई केली जाईल.
4. ही कारवाई कोणत्या पार्श्वभूमीवर केली जात आहे?
→ महापालिकेच्या कामकाजात शिस्त आणि कार्यक्षमतेत सुधारणा आणण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे.
5. पुणेकरांवर या कारवाईचा काय परिणाम होऊ शकतो?
→ प्रशासन अधिक कार्यक्षम झाल्यास स्वच्छता, रस्ते आणि सांडपाणी व्यवस्था यात सुधारणा दिसू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.