"राजन पाटलांचं महत्व कमी होणार नाही" : जयंत पाटलांनी दिला शब्द

Jayant Patil | NCP | Mohol | Rajan Patil : जेव्हा कोणी नव्हते तेव्हा राजन पाटील होते...
Jayant Patil _ Rajan Patil
Jayant Patil _ Rajan Patil Sarkarnama

मोहोळ : पक्षाला ओहोटी लागली असताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाची जबाबदारी माझ्यावर दिली. आम्ही शिवस्वराज्य यात्रा काढली. तेव्हा कोणीही सभा घेत नव्हते. त्यावेळी राजन पाटील (Rajan Patil) यांनी सभा घेतली. अनेक नेते राष्ट्रवादी सोडून जात होते. तेव्हा देखील राजन पाटील आणि त्यांचे सहकारी राष्ट्रवादीसोबतच एकनिष्ठ राहिले. त्यामुळे कोणी कितीही कोल्हेकुई केली तरी राजन पाटील यांचं महत्त्व कमी होणार नाही", असा शब्द देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांचे कौतुक केले.

मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वातील पहिल्या दिवशी शेवटची सभा मोहोळ विधानसभा मतदारसंघात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जयंत पाटील पुढे म्हणाले, "२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी परिस्थिती विचित्र होती. लोक पक्ष सोडून जात होते. राष्ट्रवादीचा निकाल चांगला लागणार नाही, असे भाकीत व्यक्त करत होते. तेव्हा शरद पवार यांनी संपुर्ण राज्याचा दौरा केला आणि लोकांनी त्यांच्या प्रत्येक सभेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सोलापूरातही भव्य सभा घेण्यात आली आणि लोकांनी आम्हा सर्वांना साथ दिली. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार नाही, असे सतत बोलले जात होते. मात्र शरद पवार यांचे मार्गदर्शनात आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले.

आज दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी चांगले काम करत आहे. कोविडच्या काळातही राज्याने चांगले काम केले ज्याची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलत असताना महाराष्ट्राने इतर राज्यात कोरोना पसरवला, असे सांगितले. मोघलांना जसे संताजी-धनाजी दिसायचे तसे केंद्र सरकारला महाराष्ट्र दिसते. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला योग्य मदत दिली जात नाही, सहकार्य केले जात नाही. उलट महाविकास आघाडी सरकार कसे पडेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी टीकाही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केली.

आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकांमध्ये ताकदीने लढा आणि चांगले यश मिळवा. या भागातील शिरापूर, आष्टी योजना २०२३ आधी पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जेवढा निधी लागेल तेवढा देण्याचे काम करू. तसेच इतरही योजना पूर्ण केल्या जातील. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अधिक सक्षम करा, असे कार्यकर्त्यांना आवाहन करताना जयंत पाटील म्हणाले. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार दिपक साळुंखे, कार्याध्यक्ष उमेश पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com