

Solapur, 16 June : विधान परिषद निवडणुकीसाठी व्हीप बजावणे, ही पक्षाची सर्वसाधारण प्रक्रिया आहे. भाजप कोणालाही घाबरत नाही. भाजपचे सर्व मतदार ठाम आहेत. भाजपकडं जेवढी मतं आहेत; त्याहून 200 अधिक मतं घेऊन राजेंद्र राऊत हे निवडून येतील, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बोलून दाखवला.
पालकमंत्री जयकुमार गोरे हे नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तपपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सोलापूरमध्ये आले होते. या वेळी त्यांनी सोलापूर, सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीबाबत भाष्य केले.
विधान परिषद निवडणुकीसाठी मतदार असलेल्या भाजपने आपले नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींसाठी व्हीप बजावला आहे. ही सर्वसाधारण प्रक्रिया आहे, असे सांगून गोरे म्हणाले, विरोधक घरी झोपतात; म्हणून त्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे.
माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथील अपघाताचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला. पण, त्या विहिरीला संरक्षण कठडा असता तर अपघात झाला नसता, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
ठेकेदाराला सोडणार नाही : गोरे
महामार्गाचे काम करणारा जो ठेकेदार आहे, त्याला अनेकदा नोटिसा पाठवल्या होत्या. पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केले, त्यामुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे, त्या ठेकेदाराला सोडलं जाणार नाही, असा इशारा जयकुमार गोरे यांनी दिला.
राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच्या विहिरींची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. काही विहिरींना संरक्षक कठडे करावे लागतील, तर काही विहिरी बुजवाव्या लागतील. कुठल्याही विभागाला आपली जबाबदारी टाळता येणार नाही.
ठाकरेंच्या खासदारांच्या नव्या गटाला शुभेच्छा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदार फुटून स्वतंत्र गट अस्तित्वात येणार असल्याच्या बातम्यांबाबत गोरे म्हणाले, नवीन गटाला माझ्या शुभेच्छा आहेत. असा कोणता नवीन गट तयार होत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू. मी जिल्हा पातळीवरील छोटा कार्यकर्ता आहे. राष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी चालतात, याची मला कल्पना नाही.
ज्यांनी नारीवंदन विधेयकाचा विरोध केला, त्यांना त्याचे उत्तर मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठल्याही परिस्थितीत नारीवंदन विधेयक मंजूर करण्याचा संकल्प केला आहे. जे जे घटक नारीवंदन विधेयक मंजूर होऊ नये; म्हणून प्रयत्न करत होते, त्यांच्या पक्षामध्ये असंतोष आहे. भविष्यात हे बिल मंजूर होईल आणि महिला भगिनींना न्याय मिळेल, असा दावाही जयकुमार गोरे यांनी केला.
दीपके मारहाणीचे समर्थन करणार नाही
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके मारहाण प्रकरणबाबत गोरे म्हणाले, आम्ही या गोष्टीचे समर्थन करणार नाही. का झाले याच्या खोलातही मी जाणार नाही. आपण सर्वांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत.
अन्नत्याग आंदोलन नेमकं कशासाठी होतं?
आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी होते की प्रसिद्धीसाठी याचं उत्तर शोधलं पाहिजे, असा टोला मंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.