शिर्डी ( जि. अहमदनगर ) - कोल्हापूरमधील खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला भाजप नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांनी पाठिंबा दिला आहे. ( Raosaheb Danve said, we have one hundred percent support for Sambhaji Raje Chhatrapati's fast ... )
शिर्डीत भाजपचे दोन दिवसीय अभ्यास शिबिर सुरू आहे. या शिबिराला आले असता दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या प्रसंगी रावसाहेब दानवे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने संभाजीराजे छत्रपती यांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला आमचा शंभर टक्के पाठिंबा असल्याचेही यावेळी दानवे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप होत आहे. मात्र भाजपच्या नेत्यांना या तपास यंत्रणांचा त्रास झाला नाही का, असा सवाल उपस्थित करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनाही सीबीआयच्या चौकशीस सामोरे जावे लागले. त्यावेळी आम्ही असे आरोप केले नाहीत. त्यामुळे तपास यंत्रणा त्यांचे काम करत असून, त्यांच्यावर कुठलाही दबाव नसल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.
राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असून, या प्रश्नांवरून लक्ष विचलीत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आरोप-प्रत्यारोप करत आहे. खरेतर राज्यात ज्या योजना आहेत, त्या सुरळीत चालवण्याची सरकारची जबाबदारी आहे. मात्र हे योजना बंद करणारे सरकार आहे. आमच्या काळात देखील आरोप होत होते. परंतु आम्ही त्याकडे दुर्लक्ष करून विकासाकडे लक्ष केंद्रित करत होतो, असे सांगत तुमच्यात नेता कोण, हे प्रथम सांगावे. 2024 काय पण त्यानंतर आघाडीचे नेतृत्व कोण करणार, असा खोचक सवालही त्यांनी केला.
राज्यात भाजपचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्या आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर ते टिकवण्यात यश मिळवले. पण दुर्दैवाने आमचे सरकार गेले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्यास आव्हान दिले गेले. तेव्हा तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी बसून न्यायालयात पुरावे सादर केले असते, तर हे आरक्षण टिकू शकले असते. पण तसे प्रयत्न झाले नाहीत, म्हणून न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. हे राज्य सरकारचे अपयश आहे, असेही ते म्हणाले.
राज्यातील शेतकऱ्यांकडे महाविकास आघाडीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ईडा-पीडा टळू दे, राज्यात शेतकऱ्यांचे सरकार येऊ दे, असे साकडे साई चरणी घातले आहे.
- रावसाहेब दानवे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.