राजेंद्र त्रिमुखे
Ahmednagar News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत वेळोवेळी पडलेल्या फुटीनंतर आता रविकांत तुपकर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. पुन्हा एकदा स्वाभिमानीत फूट पडणार का असा विषय ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्राउंडवर वर्षेनुवर्षं काम करणारा स्वाभिमानाचा एक गट आता भावनिक आणि आक्रमक झाला आहे. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्यामुळे पदे मिळाली असे सांगणारे नेते कसे दूर गेले यासाठी त्यांच्या जुन्या भाषणाच्या क्लिप व्हायरल करत शेट्टींनी बहुजन समाजातील आपल्या नेत्यांना वेळोवेळी न्याय दिल्याचे सांगितले आहे.
सहकार आणि सत्ता काबीज केलेल्या पुढाऱ्यांच्या नगर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे आक्रमक पणे काम करत आहेत. रविकांत तुपकर यांच्या संदर्भात येत असलेल्या बातम्या, शेट्टींवर बहुजन कार्यकर्ते-नेते यांच्यावर केलेल्या आरोपांनी व्यथित होत त्यांनी "तुपकर यांच्या बंडा मागे अदृश्य शक्ती असल्याचा संशय व्यक्त केला आहे. माजीमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या भाषणाचा जुना व्हिडीओ सोशल माध्यमातून पाठवत त्यांनी राजू शेट्टी यांनी वेळोवेळी बहुजन समाजातील नेत्यांच पदे, आमदारकी, मंत्रिपदे दिली हे सांगण्याचा प्रयत्न केला.
आजपर्यंत जे बंड झाले ते निवडणूक डोळ्यासमोर ठेवून झाले आहे. उल्हास पाटील, सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर अशी अनेक उदाहरणे मोरे यांनी दिली आहेत. खोत यांना विधान परिषद आमदार व स्वाभिमानीच्या कोट्यातून पहिले मंत्रिपद दिले. देवेंद्र भुयार आणि भारत भालके यांनी राजू शेट्टींचा शिडी प्रमाणे वापर करीत आमदारकी मिळवली, असा आरोप मोरे यांनी केला आहे.
रविकांत तुपकर यांना शेट्टींनी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद बहाल केले होते. त्याच तुपकरांनी दुसऱ्यांदा शेट्टी यांच्या विरोधात बंडाचा झेंडा उगारला. शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) नंतर आता स्वाभिमानीचे पर्यायाने राजू शेट्टी यांचे खच्चीकरण करणे हाच मुख्य अजेंडा तुपकर यांच्या बंडा मागे आहे. या संशयाला नक्की वाव आहे, असा आरोप मोरे यांनी केला आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.