श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) - भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत सदाशिव पाचपुते यांचे मागील वर्षी निधन झाले. ते जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच साईकृपा उद्योग समुहाचे अध्यक्ष होते. पुढील महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत त्यांची जागा त्यांचाच वारसदार लढविणार अशी चर्चा सुरू झाली आहे. ( Sadashiv Anna's successor is a political entry )
सदाशिवअण्णा पाचपुते यांची उणीव पाचपुते गटाला नेहमीच जाणवणार आहे. निवडणूक यंत्रणेतील खाचाखोचा माहिती असणाऱ्या सदाशिव पाचपुते यांनी वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. त्यांच्या अचानक जाण्याने पाचपुते गटात तयार झालेली पोकळी लपून राहत नाही. त्यांच्यानंतर साजन शुगर कारखान्याची जबाबदारी यशस्वीपणे पेलणाऱ्या साजन पाचपुते यांच्या ‘राजकीय एन्ट्री’कडे अनेकांचे डोळे लागले आहेत. नव्या दमाचा हा तरुण भाजपचा नवा चेहरा ठरू शकतो, असेही बोलले जाते.
आमदार बबनराव पाचपुते यांनी आजारणातही ठेवलेला जनसंपर्क वाखाणण्याजोगा आहे. आजही तालुक्यात एकहाती सत्ता आणण्याची हिंमत केवळ याच पाचपुते कुटुंबात आहे, असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. काहीअंशी ते खरे असल्याने, पाचपुते यांचे तालुक्यातील अस्तित्व अबाधित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबावर आलेली संकटे त्यांच्या राजकीय अडचणी वाढविणारी ठरली आहेत. सदाशिव पाचपुते यांची अचानक झालेली ‘एक्झिट’ हा त्याचाच भाग आहे.
सदाशिव पाचपुते यांचे प्रथम पुण्यस्मरण येत्या 8 फेब्रुवारीला असल्याने, त्यानंतर या कुटुंबात नव्या पर्वाला सुरवात होणार असल्याचे बोलले जाते. साजन सदाशिव पाचपुते हे त्यानंतर त्यांची राजकीय इनिंग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. साजन शुगर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी दाखविलेली परिपक्वता निश्चितच अनेकांना सुखावणारी, तर काहींना अडचणीत टाकणारी आहे.
वडिलांच्या अकस्मात जाण्याने कारखान्याची जबाबदारी खांद्यावर घेत साजन व सुदर्शन या बंधूंनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन तर केलाच; शिवाय दराबाबत एक पाऊल पुढे राहत विश्वासही दिला. साजन हे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण करतील, अशी चर्चा आहे. या तरुणाची भाजपच्या नेत्यांमध्ये असणारी जवळीक त्यांना आगामी काळात उपयोगी ठरेल.
इतर पक्षांत जमविलेले मित्र ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. राजकीय सल्लागारांकडे त्यांची होणारी विचारपूस भविष्यातील राजकीय जडणघडणीची तयारी असल्याचे दिसते. जिल्हा परिषद व पंचायत समितीसह बाजार समिती निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात ते त्यांची परीक्षा करून घेतात का, याकडे तालुक्याचे लक्ष आहे.
काष्टी की येळपणे?
साजन पाचपुते हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत नशीब अजमावण्याची दाट शक्यता आहे. गटांचे आरक्षण अजून न पडल्याने त्याबद्दल ते थेट भाष्य करीत नसले, तरी काष्टी अथवा येळपणे जिल्हा परिषद गटातून ते उमेदवारी करण्याची चाचपणी करीत आहेत. काष्टी पाचपुते यांचे ‘होम पीच’ आहे, तर येळपणे गटात कारखाना असल्याने, दोन्ही ठिकाणी त्यांची चर्चा सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.