Kolhapur News: राज्याच्या राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गट भाजपसोबत सत्तेत सामिल झाला. यामध्ये अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथही घेतली. यामध्ये राष्ट्रवादीचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचाही समावेश आहे.
हसन मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. आधीच निवडणूक लढण्याची तयारी करुन बसलेले भाजपचे कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आता कागल विधानसभेची निवडणूक लढून विक्रमी मताने आपण जिंकणार असल्याचा दावा करत एक प्रकारे मोठी घोषणाच केली आहे.
हसन मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर समरजितसिंह घाटगे यांनी आपण कुटुंबियांशी चर्चा करुन आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर अखेर समरजितसिंह घाटगे यांनी आज त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपली भूमिका जाहीर करत हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे.
समरजितसिंह घाटगे यांनी आज कागलमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. आपण दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, असं सांगत आपण भाजपातच राहणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, "मी आज या ठिकाणी येताना गुलाबी कुर्ता घालून आलोय. त्यामुळे आज मी या ठिकाणी घोषीत करतो, आपल्या विजयाचे भूमिपूजन या ठिकाणी झालेले आहे. आपण आमदारकी फक्त लढणारच नाही तर मोठ्या मताधिक्याने जिंकणार", असा दावा यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी केला.
"राज्यात ज्या घडामोडी घडल्या आहेत. आता आपण सर्वांनी फक्त एक शपथ घ्यायची, 2024 ला मोठ्या मताधिक्याने कागलचा कोंढाणा आपण परत घ्यायचा, यासाठी उद्यापासून कामाला लागा", असे थेट आदेशच समरजितसिंह घाटगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.