Sangli News : आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असल्याने सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे संजय काका पाटील हे विद्यमान खासदार आहेत. आता काँग्रेसही तयारीला लागली आहे. काँग्रेसने लोकसभा समन्वयक जाहीर केले असून कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसभा समन्वयकपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर सांगलीच्या समन्वयकपदी सतेज पाटील यांची वर्णी लागलेली आहे. सांगली जिल्हा दाैऱ्यावर कोल्हापूरचे समन्वयक असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीच्या उमेदवाराचे नाव जाहीर करत काँग्रेसचं सांगली लढवणार असल्याचे स्पष्ट केले. (Latest Marathi News)
सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असतानाही 2014 साली खासदार संजय काका पाटील यांनी काँग्रेसच्या प्रतीक पाटील यांचा मोठा पराभव केला होता. त्यानंतर 2019 साली झालेल्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विशाल पाटील यांना तर वंचितने गोपीचंद पडळकर यांना संधी दिली. वंचित आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगवेगळी लढल्याने त्याचा फायदा भाजपाला झाल्याचे आजही सांगितले जात आहे.
काँग्रेसचे असलेले परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढलेल्या विशाल पाटील यांनी 3 लाख 44 हजार 643 तर गोपीचंद पडळकरांनी 3 लाख 234 मते मिळवली होती. भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी 5 लाख 8 हजार 995 मते मिळवत दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली. आता गोपीचंद पडळकर भाजपामध्ये जावून बसले असल्याने महाविकास आघाडी याठिकाणी काँग्रेसला संधी देईल, असा अंदाज बांधला जात आहे.
सांगली येथे पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभा मतदार संघ काँग्रेसकडेच राहणार असून या ठिकाणी उमेदवार म्हणून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील निवडणूक लढवतील असे सांगण्यात आले आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना सांगली लोकसभेवर दावा करत उमेदवारही जाहीर केल्याने आता महाविकास आघाडीकडून तयारी सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर आता राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना ठाकरे गटाची काय भूमिका असणार लवकरच स्पष्ट होईल.
सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा आहे. याबद्दल शंका बाळगू नका. लोकसभेला विशाल पाटील लढतील, यावर आता एकमत झालेले आहे. त्यांची तयारी भक्कम आहे. गेल्यावेळी वंचित आघाडीचा फटका बसला होता. यावेळी सांगलीचा मतदार सावध आहे, तो काँग्रेसच्या मागे ताकद उभी करेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करायचा असेल, तर विरोधी मतांची विभागणी टाळली पाहिजे. यावर इंडिया आघाडीचे एकमत आहे. देशात किमान साडेचारशे जागेवर एकास एक उमेदवार दिला जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.