Pawar Politic's : पवार काका-पुतण्याची मोठी स्टॅट्रेजी; बालेकिल्ल्याच्या पुनर्बांधणीसाठी थोरल्या अन्‌ धाकट्या पवारांनी कऱ्हाडमधून डाव टाकला!

Sharad Pawar& Ajit Pawar Satara Tour : थोरल्या आणि धाकट्या पवारांचा बालेकिल्ला म्हणूनच पूर्वी सातारा जिल्ह्याकडे पाहिले जायचे. थोरले पवारच सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्वी ठरवत होते.
Sharad Pawar-Balasaheb Patil-Udaysinh Patil Undalkar-Ajit Pawar
Sharad Pawar-Balasaheb Patil-Udaysinh Patil Undalkar-Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Karad, 19 April : एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा जिल्हा हा बालेकिल्ला होता. मात्र, सध्या तो राहिलेला नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढविण्यासाठी स्टॅट्रेजी आखली आहे. ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकरांचा आज होणारा पक्षप्रवेश बालेकिल्ल्याच्या पुनर्रेचनेचा एक भाग असून पक्षाचे गतवैभव मिळवून देण्यासाठी खुद्द अजितदादा मैदानात उतरले आहेत.

दुसरीकडे, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कडवे आव्हान मोडीत काढत सह्याद्री साखर कारखान्याची सत्ता सहाव्यांदा ताब्यात ठेवली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे आपल्या लढवय्या नेत्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी सोमवारी (ता. २१ एप्रिल) कऱ्हाडात येत आहेत. पवार काका-पुतण्यांचा एक दिवस अंतराने होणारा कराड दौरा हा आगामी निवडणुकीची नांदी मानली जात आहे. ह्या दोन्ही नेत्यांच्या कराड दौऱ्यानंतर सातारा जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलणार का, याची उत्सुकता जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला आहे.

सातारा (Satara) जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसला राज्यातील बदलेल्या राजकीय घडामोडींचा मोठा फटका बसला आहे. थोरल्या आणि धाकट्या पवारांचा बालेकिल्ला म्हणूनच पूर्वी सातारा जिल्ह्याकडे पाहिले जायचे. थोरले पवारच सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्वी ठरवत होते. त्यांनी सातारा आणि राज्याच्या राजकारणात अनेकांना घडविले आहे. तसेच, लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी तीन पक्षाच्या महायुती सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री बनले आहेत. अजितदादा बाहेर पडल्यानंतही थोरल्या पवारांनी नेटाने नवा पक्ष बांधला आहे. सातारा जिल्हा हा धाकट्या पवारांपेक्षा थोरल्या पवारांना मानणारा आहे. त्यांचे जिल्ह्यात मोठे वजन हेाते, त्यामुळे अजितदादांसोबत जाण्यास जिल्ह्यातील कोणीही तयार नव्हते. सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी अजितदादांना पाठिंबा दिला नव्हता.

Sharad Pawar-Balasaheb Patil-Udaysinh Patil Undalkar-Ajit Pawar
Sangram Thopte News: मोठी बातमी! संग्राम थोपटेंनी दिला काँग्रेसचा राजीनामा; दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश?

एकीकडे अजितदादांना पाठिंबा मिळत नसताना माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे राज्यात पहिल्यांदा जाहीर केले होते. तेव्हापासून बाळासाहेब पाटील हे पवारांसोबत कायम आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीत काहींसी नमती भूमिका घेतलेल्या अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी करत उमेदवार उभे केले. जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले. त्यातील मकरंद पाटील यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे अजितदादांनी मंत्री केले. त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून मकरंद पाटील जिल्ह्यात राष्ट्रवादीचा गजर करण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी मकरंद पाटील यांचे बंधू आणि सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना खासदारकी दिली आहे. त्यामुळे पक्षवाढीची जबाबदारी दोन बंधूंच्या खांद्यावर अजितदादांनी सोपवली आहे. लोकसभेला कोणीही जवळ येत नसताना सातारा जिल्ह्यात एक मंत्री, एक खासदार, एक आमदार अशी फौज उपमुख्यमंत्री पवार यांनी तयार केली आहे. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा बनविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादांनी डावपेच आखले आहेत. त्यातूनच शनिवारी (ता. १९ एप्रिल) माजी सहकारमंत्री तथा काँग्रेसचे निष्ठावंत नेते (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र ॲड. उदयसिंह उंडाळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना अस्मान दाखविणारे भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा चितपट करण्याची तयारी केली होती. तसेच, काँग्रेसचे नेतेही विरोधात होते. कारखान्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही तिरंगी झाली. त्यात पाटील यांनी भाजप आमदार मनोज घोरपडे आणि ॲड. उंडाळकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ, कॉंग्रेसचे निवास थोरात या नेत्यांच्या दोन्ही पॅनेलचा दणदणीत मतांनी पराभव केला.

‘सह्याद्री’मधील विजयाने पाटील गटात उत्साह संचारला आहे. पाटील गटाला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोषक वातावरण तयार झाले आहे. भाजपसारख्या सत्ताधाऱ्यांसमोर लढून एकहाती विजय मिळविणारे सह्याद्री कारखान्याचे नवनिर्वाचीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे सोमवारी (ता. २१) कऱ्हाडला येणार आहेत. पवारांच्या दौऱ्याच्या निमित्ताने बाळासाहेब पाटील यांनीही शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी केली आहे.

Sharad Pawar-Balasaheb Patil-Udaysinh Patil Undalkar-Ajit Pawar
Dhairyasheel Mohite Patil: नेत्यांचा फिटनेस: शरद पवारांचा खासदार देतोय कुस्तीपटूंना धडे; सायकलिंगमधून मिळते राजकीय प्रवासाला गती

बॅलेट पेपरचा मुद्दा पुन्हा चर्चेत

पवार आणि सातारा जिल्ह्याचे एक वेगळे नाते आहे, त्यामुळे कराडमध्ये येणारे पवार काका-पुतणे काय बोलणार, याची सातारा जिल्ह्याला उत्सुकता आहे. ॲड उंडाळकर यांना उपमुख्यमंत्री पवार हे काय ऑफर देणार, कोणती नवीन घोषणा करणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यांत सह्याद्री साखर काखान्याची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली. त्यात बाळासाहेब पाटील यांनी बाजी मारली आहे, त्यामुळे ईव्हीएम आणि बॅलेट पेपरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बॅलेट पेपर असता तर विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांनी बाजी मारली असता, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार त्यावर काय भाष्य करतात, हेही पाहावे लागणार आहे.

Editd By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com