विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरु असतानाच शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रात आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. जागा वाटपाच्या आधीच अप्रत्यक्षरीत्या उमेदवारी जाहीर करीत प्रचारही सुरु केला. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सांगली जिल्ह्यातील खानापूर-विटा मतदार संघातून महायुतीमधून स्वर्गीय माजी आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांच्या उमेदवारीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करुन श्रीकांत शिंदे यांनी महायुतीत अडचणीत निर्माण केल्या होत्या. त्यानंतर आता सांगलीत श्रीकांत शिंदे यांनी जागावाटपापूर्वीच उमेदवार जाहीर केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आटपाडी येथील दहीहंडी सोहळ्याला हजेरी लावत सुहास बाबर यांच्या प्रचाराची हंडी श्रीकांत शिंदे यांनी फोडली. त्यांनी प्रत्यक्षपणे सुहास बाबर यांची उमेदवारी जाहीर केली. खानापूर विटा मतदारसंघातल्या जनतेने 'पाणीदार' आमदार स्वर्गीय अनिल बाबर यांच्याप्रमाणे सुहास बाबर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं,असे जाहीर आवाहन शिंदेंनी केले.
खानापूर विटा मतदारसंघातून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर भाजपाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत,तर जागा वाटपाच्या आधी शिंदे यांनी सुहास बाबर यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
"मी सुहास बाबर यांना शुभेच्छा देतो. पुढच्या दोन महिन्यामध्ये आपल्याला विजयाची दहीहंडी साजरी करायची आहे. आज प्रचाराची दहीहंडी फुटली आहे. आज आमची बैठकही झाली. दोन महिन्यांनंतर आपल्याला खऱ्या अर्थाने विकासाची दहीहंडी फोडायची आहे. तेव्हा ८ थरांपेक्षा जास्त थरांची दहीहंडी आपल्याला उभी करायची आहे. सर्वात वर सुहास बाबर यांना चढायचं आहे. आपल्या सगळ्यांना त्यांच्यामागे खंबीरपणे उभं राहायचं आहे,” असे सूचक विधान श्रीकांत शिंदे यांनी केल्यानं महायुतीत वात पेटवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.