

Solapur, 11 September : पक्षशिस्त आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामकाजाचे धडे देण्यासाठी ठाण्यातील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत भाजप नगरसेवकांसाठी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिराला पहिल्या दिवशी सोलापुरातील १९, तर दुसऱ्या दिवशी २६ नगरसेवकांनी दांडी मारली. शिबिराला दांडी मारणाऱ्या नगरसेवकांविरोधात भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी याबाबतची माहिती दिली. पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत ठाण्यातील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर झाले.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी महापालिकांमधील भाजपच्या १९५ नगरसेवकांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश बन्सल, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मार्गदर्शन केले.
सोलापूर महापालिकेत ८७ नगरसेवक निवडून आले आहेत, तर नऊ स्वीकृत नगरसेवक आहेत. त्यामुळे ठाण्यातील शिबिराला सोलापुरातून एकूण ९६ नगरसेवक उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र पहिल्या दिवशी १९ आणि दुसऱ्या दिवशी २६ नगरसेवकांनी शिबिराला दांडली मारली.
नगरसेवकांनी प्रशिक्षण शिबिराला मारलेल्या दांडीचे भाजप श्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली आहे. या दांडीबहाद्दर नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या नगरसेवकांनी योग्य कारणे न दिल्यास संबंधितांवर पक्षाकडून काय कारवाई होते, हे पाहावे लागेल.
दरम्यान, सोलापुरातील दहा नगरसेवकांनी ठाण्यातील शिबिराला गैरहजर राहण्याची पूर्वपरवानगी घेतली होती. त्यामुळे या दहा जणांवर कारवाईचा प्रश्न येणार नाही. मात्र, परवानगी न घेता दांडी मारणाऱ्या इतर नगरसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सोलापुरातील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संबंधित गैरहजर नगरसेवकांना फोन लावून अनुपस्थितीबाबत जाब विचारल्याची चर्चा आहे. काही नगरसेवकांनी त्यांचे फोन उचलले नाहीत, तर काहींनी फोन घेतला, त्यामुळे ठाण्यातील शिबिर शिस्तीऐवजी वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे.
भाजपची शिस्त 'इनकमिंग'च्या अंगवळणी पडेना
केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षात महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले आहे. त्यातील बहुतांश नगरसेवक हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत, त्यांना अशा शिस्तीच्या शिबिराला बसून राहणे थोडे अवघड जाऊ शकते. भारतीय जनता पक्षाचे शिस्तीचे धडे अंगवळणी पडण्यासाठी त्यांना काही दिवसांचा अवधी लागू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.