सोलापूर : सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देवेंद्र फडणवीसांपासून राज ठाकरेपर्यंत सर्वांनाच झोडपून काढले. त्यातून सोलापूरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीही (Jaysiddheshwar Mahaswami) सुटू शकले नाहीत. ‘सोलापूरचे खासदार कोण आहेत?’ असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारत ‘तुमची आणि खासदारांची भेट झाली, तर त्यांना सांगा मी त्यांची आठवण काढली होती’ असा निरोपही सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना दिला. (Solapur MPs never meet in Parliament: Supriya Sule)
खासदार सुळे यांनी सोलापुरातील सुशील रसिक सभागृहात शहर व ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी खासदार महास्वामी यांच्यावरही निशाणा साधला. खासदार सुळे यांनी उपस्थितांना ‘सोलापूरचे खासदार कोण आहेत?’ असा प्रश्न विचारला. त्यावर उपस्थितांमधून ‘महास्वामी आहेत, बेडा जंगमच्या बनावट प्रमाणपत्रावर ते खासदार झाले आहेत,’ असे उत्तर मिळाले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी देशातील बहुतांश खासदारांना ओळखते, तुमचे सोलापूरचे खासदार मला संसदेत कधी भेटतच नाहीत. तुमची आणि खासदारांची भेट झाली, तर त्यांना सांगा मी त्यांची आठवण काढली होती, असा निरोपही त्यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना दिला. सोलापूरच्या खासदारांची दिल्लीत भेट होईल, असेच खासदार आगामी निवडणुकीत तुम्ही निवडून द्या, असे आवाहनही खासदार सुळे यांनी या मेळाव्यातून उपस्थितांना केले.
ईडीच्या चौकशीचा जागतिक विक्रम
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर पडलेल्या छाप्यावरूनही खासदार सुळे यांनी ईडीला लक्ष्य केले. त्या म्हणाल्या की, एखाद्या व्यक्तीची किती वेळा चौकशी करायची असते? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तब्बल १०३ वेळा ईडीने चौकशी केली आहे. ईडीने केलेल्या चौकशीच्या या जागतिक विक्रमाबद्दल खासदार सुळे यांनी जाहीर सभेतच ईडीला नमस्कार केला. सुमारे १०३ वेळा चौकशी करून देखील ईडीला काहीच मिळालेले नाही.
‘जो भी किया, डंके के चोट पे किया’
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या बाबतीतही तेच होत आहे. ‘जो भी किया, डंके के चोट पे किया,’ असे सांगून खासदार सुळे यांनी मंत्री नवाब मलिक यांचे जोरदार समर्थन केले. त्या म्हणाल्या की, मंत्री नवाब मलिक यांनी तीनशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. हा आरोप त्यांनी एकदाच केला, त्यानंतर ते याबद्दल काहीच बोलले नाहीत. त्यामुळे फडणवीस पळपुटे आहेत, असा टोलाही सुळे यांनी लगावला
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.