Maharashtra Political News : सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Election 2024) महायुतीचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. राम सातपुतेंनी प्रणिती शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीकास्त्र डागले. आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदेंनी (Praniti Shinde) सातपुतेंना उपऱ्या म्हणून डिवचलं होते.
सातपुतेंनी शिंदे कुटुंबीयांच्या राजकीय इतिहासाची आठवण करून प्रत्युत्तर दिले. यांच्या (प्रणिती शिंदे) वडिलांनी कधी करमाळा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूरमधून निवडणूक लढलेली आहे. मग ते उपरे होते का? असा सवाल सातपुतेंनी उपस्थित केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
करमाळा मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि जनतेने सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवारांना निवडूनदेखील दिले होते. त्यावेळी ते उपरे नव्हते का? असा सवाल सातपुते यांनी उपस्थित करीत प्रणिती यांना टोला लगावला. तीन वेळा पराभव झालेल्या शिंदे परिवाराला पुन्हा चौथ्या वेळी धूळ चारू, असे आव्हान सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांना दिले आहे.
"आम्ही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेलो नाही. माझा बाप आमदार, खासदार, मुख्यमंत्री नव्हता तर मी एक ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. ऊसतोड कामगाराचा मुलगा विरुद्ध श्रीमंताची कन्या असा हा संघर्ष आहे. ही निवडणूक सोलापूरच्या जनतेने हातात घेतलेली आहे.
मला त्या उपरा उमेदवार म्हणतात, पण मी सोलापूर जिल्ह्यातील आमदार आहे, सोलापूरचा सालगडी म्हणून मी काम करेन, सोलापूर लोकसभेची लढाई समोरासमोर आहे. त्यांना दहा वर्षांपूर्वीचा हिशोब द्यावा लागेल, असे सातपुते म्हणाले.
राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर होताच सोमवारी सायंकाळी त्यांचे सोलापूर शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. सकाळी प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर पत्र व्हायरल करीत सातपुतेंचे अभिनंदन करीत टोला लगावला होता. त्याला सातपुतेंनी प्रत्युत्तर दिले.
बाहेरील, उपरा उमेदवार अशी टीका होताना, सातपुतेंनी शिंदे परिवाराला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुशीलकुमार शिंदेंचा खासदारकीच्या निवडणुकीत दोन वेळा पराभव झाला होता, त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांचा एकदा पराभव झाला. तीन वेळा पराभव झालेल्या शिंदे परिवाराला पुन्हा चौथ्या वेळी धूळ चारू, असे आव्हान सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांना दिले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.