सातारा : ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याच्या परिसरातील भूभागाचे भूस्खलन अथवा दरडी कोसळण्याची भिती आहे. या परिसराच्या पायथ्याशी सातारा शहरातील वसाहती मोठ्याप्रमाणात असून त्यांच्या संरक्षणासाठी भिंत बांधणे व इतर उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी ३२.४४ कोटींचा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. दरम्यान, याबाबत तातडीने निर्णय घेऊ, अशी ग्वाही श्री. पवार यांनी दिली आहे.
शिवेंद्रसिंहराजेंनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, ऐतिहासिक अजिंक्यतार किल्ल्याच्या पायथ्याला सातारा शहर वसलेले आहे. पायथ्यालगत डोंगरी भागात सुमारे दोन किलोमीटर लांबीपर्यंत मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत झालेली आहे. सातारा येथे पावसाचे प्रमाण खुप जास्त असते. त्यामुळे जास्तीच्या पावसात किल्ल्याच्या भुभागाचे भूस्खलन अथवा दरड कोसळण्याची भीती असल्याने पायथा परिसरात झालेल्या वसाहतींच्या संरक्षणासाठी संरक्षक भित बांधणे व इतर उपाययोजना करणेसाठी ३२.४४ कोटी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
याबाबत शिवेंद्रसिंहराजे यांनी वाई, महाबळेश्वर दौऱ्यावर आलेल्या श्री. पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशीकांत शिंदे, मकरंद पाटील उपस्थित होते. जुलै २०२१ मध्ये सातारा येथे झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात आपण सातारा येथील बैठकीत सुचना देऊन अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्यालगत झालेल्या वसाहतीच्या संरक्षणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन शासनास सादर करणेबाबत निर्देश दिले होते.
त्याअनुषंगाने अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्यावर वसलेल्या वसाहतीच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणेसाठी सातारा नगरपरिषदेने तज्ञामार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. यामध्ये रिटेनिंग वॉल बांधकाम, किल्ल्यावरील पावसाचे पाणी वाहुन जाणेसाठी रिटेनिंग वॉललगत गटर व लगतच्या ओढ्याचे बळकटीकरण अशा बाबींचा समावेश केलेला आहे. या कामासाठी ३२. ४४ कोटी खर्च अपेक्षित आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल प्रधान सचिव (२), नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सादर करण्यातत आला आहे.
या कामासाठी शासनामार्फत आपत्कालिन बाब म्हणून विशेष अनुदान उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. नागरी वसाहत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कामासाठी तातडीने ३२.४४ कोटी अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी श्री. पवार यांच्याकडे केली. याबाबत तातडीने निर्णय घेऊ, असे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याने सातारा शहराच्यादृष्टीने महत्वाचा असणारा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.