सातारा : महाविकास आघाडीची कोंडी करण्यासाठी भाजपने (BJP) कंबर कसली आहे. यासाठी राज्यभरातील महापालिकांपासून ग्रामपंचायतींपर्यंत भाजपने रणनिती आखल्याचे दिसत आहे. आगामी निवडणुका डोळय़ासमोर ठेवून आता भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच जिल्हाध्यक्षपदाची धुरा आमदार जयकुमार गोरेंवर (Jaykumar gore) सोपवली आहे. साताऱ्यात राष्ट्रवादीला नामोहरम करण्यासाठी आक्रमक आमदार जयकुमार गोरे यांची निवड करण्यामागे भाजपची ही रणनीती असल्याचे बोलले जात आहे. (Jayakumar Gore News)
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जिल्हाध्यक्षपदी आमदार गोरेंची निवड केली आहे. जिल्हा परिषद सदस्य ते आमदारकी अशी वाटचाल असलेले जयकुमार गोरे यांनी वाटचाल केली आहे. विशेष म्हणजे ही नवीन जबाबदारी पेलताना त्यांना त्यांना जुन्या-नव्यांचा मेळ घालत वाटचाल करावी लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातारा भाजपमध्ये अनेकजण नाराज आहेत, त्या सर्वांना विश्वासात घेऊन पक्षसंघटनेत सक्रिय करावे लागणार आहे. (Jayakumar Gore elected as District President)
गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने सात सदस्य जिंकत जिल्हा परिषदेत प्रवेश केला. आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका व बाजार समितींच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर भाजपने साताऱ्यात पक्ष संघटन वाढविण्यासाठी पहिल्यांदाच एका आमदाराची जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. जयकुमार गोरे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात विविध प्रश्नांवर आवाज उठवला होता. त्यांचा क्रमकपणा लक्षात घेऊनच जिल्ह्यात राष्ट्रवादीला टक्कर देण्याची भाजपची रणनीती आहे. विशेष म्हणजेच आमदार गोरेंच्या या निवडीमुळे जिल्हा भाजपमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या या निर्णयाचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे. जिल्ह्यात भाजपची वाढलेली ताकद व कार्यकर्त्यांचे जाळे लक्षात घेता मावळते जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना प्रदेशवर संधी देताना त्यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे. मात्र तरीही पक्षातील पावस्कर समर्थकांची नाराजी दूर करत त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय करताना त्यांना विश्वास द्यावा लागणार आहे. भाजपमधील नवीन व जुन्यांचा मेळ साधण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, भरत पाटील, मदन भोसले या दिग्गज नेत्यांची साथ मिळणेही गरजेचे आहे.
सध्या साताऱ्यातील कऱ्हाड, सातारा, फलटण, माण, खटाव, जावळी, वाई, खंडाळा या तालुक्यांत भाजपची ताकद आहे. मात्र कोरेगाव, पाटण व वाई तालुक्यांत त्यांना आपली त्यांना विशेष लक्ष देत भाजपची गटबांधणी करावी लागणार आहे. यासोबत त्यांना तेथील दिग्गजांशीही लढावे लागणार आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादीसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. आता आगामी निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंना भाजपसोबत राहण्यासाठी आमदार गोरे काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर फलटणमध्ये खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर हे आमदार गोरेंचे मित्र असल्याने त्यांना फलटणमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी थोडे सोपे जाऊ शकते, पण पारंपरिक विरोधक म्हणून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्याशी त्यांना लढावे लागू शकते.
भाजपचे मावळते जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या ताकदीवर भाजपने जिल्हा परिषदेवर विजय मिळवला. पावस्करांनी सातारा, कऱ्हाड, फलटण तालुक्यांत पक्षाची बुथनिहाय बांधणी करून पक्षाची ताकद निर्माण केली. त्यांच्या कामाची दखल घेत भाजपने प्रदेशवर संधी दिली आहे. आता पावस्करांनी साताऱ्यात भाजपची निर्माण केलेली ताकद आणखी वाढविण्याची जबाबदारी आमदार गोरें कशी पार पाडतात हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.