सातारा : जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची जागा वाटपावरून बैठकीची पहिली फेरी झाली. यामध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रत्येकी चार जागांवर आपला हक्क सांगितला. आमदार मकरंद पाटील यांनीही एक जागा मागितली आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा कसा सोडवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या सात नोव्हेंबरपर्यंत यावर तोडगा काढून सर्वसमावेशक पॅनेलची यादी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर अंतिम करणार आहेत.
बारामतीतील बैठकीनंतर काल (मंगळवारी) दुसऱ्याच दिवशी जिल्ह्यातील राष्ट्रवादीची नेतेमंडळींची जागा वाटपाची पहिली बैठक जिल्हा बॅंकेत झाली. या वेळी रामराजे निंबाळकर, सहकारमंत्री पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, संचालक नितीन पाटील हे उपस्थित होते. या बैठकीत प्रत्येकाने आपल्याला किती जागा हव्यात. याची माहिती सांगितली. सहकारमंत्री पाटील यांनी बॅंका व पतसंस्था मतदारसंघ, महिला राखीव, गृहनिर्माण आणि दुग्ध उत्पादक संस्था, ओबीसी, अनुसूचित जाती जमाती या मतदारसंघांची मागणी केली.
शिवेंद्रसिंहराजेंनीही बॅंका व पतसंस्था मतदारसंघ, महिला राखीव, ओबीसी, अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग हे मतदारसंघ मागितले आहेत. त्यापैकी कोणत्याही चार जागा मिळाव्यात, अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे या दोघांकडून चार मतदारसंघांवर दावा सांगण्यात आला आहे. खरेदी- विक्री मतदारसंघातून बिनविरोध झालेले मकरंद पाटील यांनी विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या जागेची मागणी केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी आगामी सात नोव्हेंबरपर्यंत चर्चेच्या फेऱ्या होणार आहेत. त्यातून मार्ग काढला जाणार आहे. दरम्यान, खासदार उदयनराजेंच्या कोट्यातून महिला राखीवमधून इच्छुक असलेल्या गीतांजली कदम यांनीही रामराजेंची भेट घेतली. त्यांच्या भेटीचा तपशील समजू शकलेला नाही.
मतांचा घेतला आढावा
सर्वसमावेशक पॅनेलला किती मते मिळतील, कुठे मते कमी पडतील या विषयावरही चर्चा झाली. यामध्ये खटाव, कोरेगाव, जावळी मतदारसंघांतील मतांबाबतही चर्चा झाली. सर्व बाबतीत चर्चा करून निर्णय केले जाणार आहेत. त्यासाठी आगामी चार दिवसांत चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होणार असल्याचे राष्ट्रवादीतील संपर्क सूत्रांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.