सातारा : महाराष्ट्र केसरीच्या चांदीच्या मानाच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात आज सायंकाळी अंतिम लढत होणार आहे. पृथ्वीराजने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली, शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली.
राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा साताऱ्यातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात सुरू आहे. पृथ्वीराज व हर्षद यांच्यातील लढत कशी होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष होते धडपड सुरू झाल्यानंतर एक मिनिट संपला तरी दोन्ही पैलवानांना एकही गुण घेता आला नाही. त्यानंतर पृथ्वीराजने एकेरी पटावर दोन गुणांची कमाई केली. दुसऱ्या फेरीत पृथ्वीराज आक्रमक झाला. त्याने भारंदाज डावावर सहा गुण मिळवले. ही लढत त्याने जिंकून प्रेक्षकांची मने जिंकली.
माती विभागात वाशिमचा सिकंदर शेख विरूद्ध मुंबई पूर्वच्या विशाल बनकर यांच्यात काटा-जोड लढत झाली. सिकंदरने चार गुण मिळविल्यानंतर विशालने त्याला जोरदार प्रत्युत्तर देत गुण वसूल केले. ही लढत उत्तरोतर रंगतदार झाली. विशालने बगल डूबवर सिकंदरला वर्च राखले. ही लढत त्याने १३ विरूद्ध १० गुण फरकाने जिंकली. त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूध्द मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात आज सायंकाळी लढत होणार आहे.
कोण किती पॉवरफुल्ल
पृथ्वीराज पाटील
: मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा - संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण - मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा - वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे - वजन ९५ किलो - आर्मीत हवालदार पदावर कार्यरत - ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी
विशाल बनकर :
पूर्व मुंबईचे प्रतिनिधित्व करतोय - सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मांडवे गाव - १९८७ चे महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचा पुतण्या - गेल्या दहा वर्षांपासून कुस्ती क्षेत्रात - सुरुवातीला भारत भोसले खवसपूर तालमीत ५ वर्ष प्रशिक्षण - मागील पाच वर्षांपासून कोल्हापुरातील श्री शाहू विजयी गंगावेस तालमीत प्रशिक्षण - ९७ किलो वजनी गटात २०१८ व २०१९ च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुवर्णपदक
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.