सागर मोटे
मिरी ( अहमदनगर ) : भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील व भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले व्यासपीठावर एकत्र आले की त्यांची शाब्दिक चकमक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. याची प्रचिती मिरी (ता. पाथर्डी ) येथे काल एका खासगी समारंभात आली. या समारंभाला भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे व माजी शिवाजी कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात खासदार विखे पाटलांना त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांवर कोपरखळी मारली. विखेंनी केलेले वक्तव्य आज जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. Who will leave BJP first: Sujay Vikhe or Kardile
या कार्यक्रमाला माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या उषा कराळे, केदारेश्वर साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश ढाकणे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे, श्रीनिंबादैत्य देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषराव देशमुख, वेणूनाथ महाराज वेताळ, पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, माजी सरपंच संतोष शिंदे, सरपंच आदिनाथ सोलाट, उपसरपंच अॅड अरुण बनकर, मार्केट कमिटीचे संचालक बाबा पाटील खर्से, बबनराव आव्हाड, ज्ञानेश्वर दराडे, आदी उपस्थित होते.
या प्रसंगी कर्डिले म्हणाले, मी जे बोलतो ते करून दाखवतो. या मिरी गावातच सुजय विखे भाजपत आले तर खासदार होतील असा विश्वास मी व्यक्त केला होता. यानंतर ते भाजपमध्ये आले आणि खासदार झाले. लवकरच ते केंद्रात मंत्री देखील होतील असा विश््वास कर्डिले यांनी व्यक्त केला.
यावर खासदार विखे म्हणाले, मी केंद्रात मंत्री होईल पण त्यासाठी तुम्ही भाजपमध्ये राहता ना. त्यावेळी कर्डिले म्हणाले जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे राहायचं पण मला तुमचा पण भरोसा वाटत नाही त्यामुळे जाताना तुम्हाला पण सोबत घेऊन जाईल असे कर्डिले म्हणताच उपस्थितांच्या चांगल्याच भुवया उंचावल्या.
पुढे कर्डिले म्हणाले, पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची मदत जमा न झाल्यास भाजपच्या वतीने मोठे आंदोलन करण्याचा इशारा कर्डिले यांनी यावेळी दिला.
यावेळी आमदार मोनिका राजळे म्हणाल्या कर्डिले विद्यावाचस्पती असल्याचे मला आता माहीत झाल्याने येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची मोठी मदत पक्षाला होईल. मिरी परिसरात मोठे महसुली क्षेत्र असून या परिसरात एक मिनी एमआयडीसी सुरू करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने खासदार विखे व माजी मंत्री कर्डिले यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आमदार राजळे म्हणाल्या.
खासदार विखे यांनी उत्तर प्रदेशात घडलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात कार घुसून झालेल्या अपघाताची जालियनवाला बाग हत्याकांडाशी तुलना करणार्या शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका करत त्यांनी मावळ येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराची आठवण करून दिली.
खुर्च्यांची ओढाताण
खासदार विखे म्हणाले, दोन दिवसांपूर्वी नगर येथे महामार्गाच्या उद्घाटनासाठी आलेले देशाचे मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारने हजारो कोटी रुपयांचा निधी दिला. तिथं श्रेय लाटण्यासाठी विरोधी पक्षाच्या लोकांनी व्यासपीठावरच खुर्च्यांची ओढतान केली. विकास निधी कोणाचा, श्रेय घेण्यासाठी धडपडतोय कोण. आमच्या सरकारने दिलेल्या निधीच श्रेय आम्हाला घेऊ द्या, अशा शब्दात खासदार विखे यांनी महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीचा समाचार घेतला.
खासदार विखेंनी पुढे सांगितले की, महाविकास आघाडीने पाथर्डी, शेवगाव, नगरसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे 50 हजारापासून एक लाखापर्यंत तातडीची मदत द्यावी. तिथं श्रेय घेण्याचा प्रयत्न करावा.
आगामी निवडणुकांचे तिकीट
केंद्र शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षाच्यावतीने तिकीट देण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. निव्वळ भाषणबाजी करणारे किंवा स्टेजवर गर्दी करणाऱ्यांनाच तिकीट मिळेल असे कोणी समजू नये. पक्षात असणारे तरी ठेप्यावर राहतात परंतु जे कोणत्याच पक्षात नसतात त्यांच्यावर लय भरोसा ठेवून चालत नाही. ते सर्वांसाठी डोकेदुखी ठरणारे असतात. त्यामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी लवकर सुरु करून जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात घेण्यासाठी सर्व मिळून निश्चितपणे प्रयत्न करू असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
शरद पवार यांच्यावर टीका
खासदार विखे म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होते त्या आंदोलनात एक कार घुसून काही निष्पाप शेतकऱ्यांचा जीव गेला ती घटना निश्चितच दुःखदायी असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे परंतु त्या घटनेची तुलना थेट जालियनवाला बाग हत्याकांडाशी करणाऱ्यांना मावळ तालुक्यात आपल्याच पक्षाचे सरकार असताना थेट शेतकर्यावर गोळीबार करून अनेक निष्पाप शेतकऱ्यांचा जीव घेणाऱ्यांचा विसर पडलेला दिसतोय अशा शब्दात खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.