मुंबई : गडचिरोली पोलिसांनी (Gadhchiroli Police) 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यानंतर देशभरातील नक्षलवादी संघटना चांगल्याच हादरुन गेल्या आहेत. गडचिरोलीतील आहेरीमधील अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे महाराष्ट्र पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या कारवाईमुळे सोमय मुंडे (Somay Munde) आणि त्यांच्या टीमचे देशभरातून कौतुक केले जात आहे. पण हे सोमय मुंडे नक्की कोण आहेत, त्यांचा आयपीएस (IPS) बनण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वत: सोमय मुंडे यांनी एका खासगी कार्यक्रमात बोलताना दिली आहे.
आपल्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल सोमय मुंडे सांगतात की, मी मुळचा नांदेडच्या देगलूरमधला. प्राथमिक शिक्षण देगलूरमधीलच साधना हायस्कुलमध्ये झाले. तर सातारा सैनिक स्कुलमधून आणि राष्ट्रीय मिलटरी कॉलेज, देहरादूरमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केलं. तर आयआयटीमधून एमटेकची पदवी घेतली. त्यानंतर प्रशासकीय सेवेसाठी ते यूपीएससीकडे वळालो. 2016 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात यांना यश मिळालं.
- असा होता सोमय मुंडेंचा आयपीएसपर्यंतचा प्रवास
चार वर्षांपूर्वी आयआयटीतून पदवी घेतली. त्यानंतर एका मोठ्या कंपनीत मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफरही आली. स्वत: च्या उज्वल भविष्यासाठी जी स्वप्ने पाहिली होती, त्यानुसारच सर्व घडत होतं. पण तरीही मन कुठेतरी चलबिचल होती. ही चलबिचल शोधली. सिनियर्सचा कॉर्पोरेट वर्ल्डमधला 9-5 चा प्रवास आणि ते धावपळीचे आयुष्य मला नको होते. आपल्याला भविष्यात काहीतरी करायचे आहे, हा निर्धार केला होता.
याच वेळी स्वत:च्या नजरेत यूपीएससीचं, आयपीएसचं एक शिखर दिसत होतं. याबाबत बोलताना सोमय सांगतात की, "महाविद्यालयीन शिक्षणासाठी 2008 मध्ये मी मुंबईत होतो. त्याच वर्षी मुंबईमध्ये 26/11 चा अतिरेकी हल्ला झाला होता. 10 अतिरेक्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. पूर्ण देश टीव्हीसमोर बसून हे सगळं पाहत होता, पण आमच्या कॉलेजमध्ये कुणाला काही वाटलं नाही, की काही फरक पडला नाही.
त्यावेळी मला वाटलं की आपण आपल्या समाजात इतके त्रास, अडचणी, बेरोजगारी, गरीबी, दहशतवादी हल्ले यांसारख्या समस्या आहेत. या सगळ्यासोबत लढण्याची एक तीव्र इच्छा मनात कुठेतरी जागी होत होती. सैनिक स्कुल आणि मिलटरी स्कुलमध्ये झालेल्या शिक्षणामुळे युनिफॉर्मची आवड एक लहानपासून मनात होती. दूर कुठेतरी एक यूपीएससीचं, आयपीएसचं एक शिखर दिसत होतं. पण हे शिखर चढू शकतो की नाही, हे माहिती नव्हतं. या दोन शिखराच्यामध्ये एक मोठी दरी होती. ती म्हणजे अपयशाची. असे अनेक अनुभव आम्ही आमच्या सिनियर्सकडून ऐकले होते. पण तरीही जे होईल ते होईल, म्हणत मारली उडी आणि लागलो अभ्यासाला.
‘तुमच्या यशानं वा अपयशानं जगाला जास्त फरक पडत नाही’
प्रशासकीय सेवेच्या अभ्यासाला सुरुवात केली. आई-वडीलही माझ्या या निर्णयाने थक्क झाले होते. रात्रंदिवस एक करत भरपूर अभ्यास केला, प्रिलिम मेन्सची परीक्षा दिली, दोन्ही क्लिअर केली. आता मुलाखतीसाठी कॉल आला आणि असं वाटलं आपलं लक्ष्य आता आपल्या खुप जवळ आहे. या कॉलनतर आता आजूबाजूच्या लोकांचं वागणंही बदललं होतं. लोक आदर द्यायला लागले होते.
आता मुलाखत झाली, पण मुलाखतीनंतरचा प्रवासही खुप कठीण होता. निकालाचा दिवस उजाडला, मी कम्प्यूटर ऑन केला आणि पीडीएफ डाऊनलोड केलं. माझं नाव तपासलं. खूप खूश झालो मी सुरुवातीला. पण सर्च झालेलं मुंडे हे नाव माझं नव्हतं. मी एकदम खचून गेलो. आई- वडिलांपासून सर्व नातेवाईक, मित्रमंडळींचे फोन येत होते. फक्त आई- वडिलांना सांगितलं की नाही झालं माझं. फोन बंद केला आणि बराच वेळ फक्त शांत बसून होतो. डोळ्यातून अश्रू येत होते, त्या दिवशी खूप रडलो. तरीही आशा सोडली नाही. पण यातून एक शिकवण मिळाली, ती म्हणजे, तुमच्या यशाने किंवा अपयशाने जगाला फार फरक पडत नाही. फक्त तुम्हाला फरक पडतो आणि क्वचित तुमच्या जवळच्या लोकांना. अपयशी झालेले तुम्ही एकटे नाहीत, त्यामुळे स्वत:च्या यशाचा किंवा अपयशाचा जास्त कुटाणा किंवा भांडवल करत बसायचं नाही.
- आणि, दुसऱ्या वर्षीच्या परिक्षेत यशाचं फळ पदरात पडलं
अपयश ही यशाही पहिली पायरी असते, असं म्हणतात हे खरंच आहे. पण अशा किती पायऱ्या चढाव्या लागतील, असे किती जिने आपल्याला वर गेल्यावर तुम्हाला यश मिळेल, हे कोणीही सांगत नाही. आता पुन्हा अभ्यासाला लागलो. पुन्हा परिक्षा दिल्या आणि यावेळी आलेल्या निकालात सोमय मुंडेंच नाव होतं. सोमय आयपीएस झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.