

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्यभरात अनेक शंका, तर्क-वितर्क आणि खळबळजनक दावे समोर येत होते. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं याचा सविस्तर A to Z घटनाक्रम उलगडून दाखवला. मुंबईहून बारामतीपर्यंतचा संपूर्ण विमानप्रवास, संबंधित कंपनी, विमानाची क्षमता आणि अपघातानंतरचे प्रश्न त्यांनी आकडेवारीसह मांडले.
रोहित पवार यांनी सांगितलं की, अपघाताच्या दिवशी सकाळी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. मुंबई ते बारामती हे सुमारे २१० किलोमीटरचं अंतर असून, हा प्रवास अवघ्या २७ मिनिटांत पूर्ण होण्याचा अंदाज होता. या प्रवासासाठी ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीचं विमान वापरण्यात आलं होतं. हे विमान अमेरिकेतील बंबार्डियर कंपनीने तयार केलेलं असून, त्याची निर्मिती २०१० साली झाली आहे.
अतिशय वेगवान विमान असून ते तब्बल 51 हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकतं. विमानात प्रवाशांच्या बॅगा बाजूला ठेवण्यात येतात आणि त्या भागात इंधनाच्या टाक्या असण्याती शक्यताही असते. अजित पवार हे विमानाच्या डाव्या बाजूला बसले असावेत, असा अंदाज रोहित पवार यांनी व्यक्त केला.
रोहित पवार म्हणाले, सकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी क्रू विमानाजवळ पोहोचला. त्यानंतर कॅप्टनने आवश्यक तपासणी केली आणि एटीसीशी संवाद साधला. सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी ‘ऑल ओके’ असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी पीएसओ विदीप जाधवही उपस्थित होते. सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सर्वजण विमानात बसले. 7 वाजून 56 मिनिटांनी मुंबई एटीसीशी संपर्क झाला आणि सकाळी 8 वाजून 10 मिनिटे 51 सेकंदांनी विमानाने टेक-ऑफ केलं.
सकाळी 8.22 वाजता विमान लोणावळ्याजवळ होतं, 8.25 वाजता पुण्याच्या हद्दीत प्रवेश झाला. त्यानंतर यवत, सुपे आणि जळगाव परिसरातून विमान मार्गक्रमण करत होतं. मात्र सकाळी 8.43 ते 8.45 या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. सकाळी 9 वाजता ‘दादा गंभीर जखमी आहेत, ते रुग्णालयात असून जिवंत आहेत’ अशी माहिती मिळाली होती. मात्र त्यानंतर काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला, अशी भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली.
अपघात अपघाती होता की त्यामागे काही वेगळं कारण आहे, असा थेट सवाल करत रोहित पवार यांनी विमान कंपनीवर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितलं की, ज्या व्हीएसआर कंपनीचं हे विमान होतं, त्या कंपनीच्या एका विमानाचा यापूर्वी २०२३ साली अपघात झाला होता. मात्र त्या अपघाताचा कोणताही अधिकृत अहवाल आजपर्यंत समोर आलेला नाही. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या अपघातानंतर मात्र विमानन विभागाने तातडीने अहवाल जाहीर केला. यावरून डीजीसीएवर व्हीएसआर कंपनीचा दबाव असण्याची शक्यता असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. २०२३ मधील अपघाताचा अहवाल दाबण्यात आला होता का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
युरोपमधील विमानन संस्थांनी या कंपनीचे काही परवाने रद्द केले होते, असंही रोहित पवार यांनी सांगितलं. तरीही हीच विमाने भारतात उड्डाण करत आहेत. अजित पवार यांचा मृत्यू होऊनही या कंपनीवर अद्याप बंदी का घालण्यात आलेली नाही, हा सवाल त्यांनी उपस्थित केला.
व्हीएसआर कंपनीबाबत अधिक माहिती देताना रोहित पवार म्हणाले की, विजयकुमार सिंग आणि रिमी सिंग हे या कंपनीचे पार्टनर आहेत. तसेच रोहित सिंग आणि विजयकुमार सिंग हे ‘व्हिस्ता सेल्स प्रायव्हेट लिमिटेड’चे भागीदार असून, लेअर जेट्सच्या क्षेत्रात या कंपनीचं जवळपास एकाधिकार स्वरूपाचं वर्चस्व आहे. सर्वाधिक विमाने याच कंपनीकडे असून, त्यांनी स्वतःची स्वतंत्र कंपनी सुरू केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.