Pune News : सकाळ आणि साम टिव्हीच्या माध्यमातून 'कल महाराष्ट्राचा' या 288 मतदारसंघाचा सर्व्हे करण्यात आला. राज्याचा मुख्यमंत्री कोण हवा, विधानसभेवर महायुती झेंडा फडकवणार का, की महायुतीचीच सत्ता राहणार, मतदारांची कुठल्या राजकीय पक्षाला पसंती आहे, या व अशा अनेक प्रश्नांचा आढावा या सर्व्हेमध्ये घेण्यात आला.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसल्याने राज्यातील महायुती सरकार बॅकफुटला आले आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीप्रमाणेच येत्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. (Sakal Survey 2024 News)
त्यासोबतच राज्यात कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री असणार यावरून अंदाज बांधले जात आहे. त्यासोबतच आता राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्नांचा आढावा घेणारा हा राज्यातील पहिला सर्व्हे आहे.
या सर्वेक्षणासाठी संमिश्र संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. राज्याच्या 288 मतदारसंघातल्या जवळपास 84 हजार 529 मतदारांनी या सर्व्हेमध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये राज्यातील सकाळचे सुमारे दोन हजारपेक्षा अधिक सहकारी सहभागी झाले होते. शहरी आणि ग्रामीण भागाची प्रभाग आणि जिल्हा परिषद गट असे भौगोलिक समतोल राखून संशोधन नमुने निवडण्यात आले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी 2024 च्या निवडणुकीत आपण कोणाला पसंती द्याल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानुसार मतदारांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 22.4 टक्के मतदारांनी पसंती दिली. त्यामुळे राज्यातील जनतेने फडणवीस, ठाकरेंना जवळपास समान पसंती दर्शवली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 14.5 टक्के नागरीकांनी पसंती दर्शवली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) या सर्व्हेत 6.8 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना 5.3 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. अजितदादांच्या तुलनेत मतदारांनी सुप्रिया सुळेंना अधिक पसंती दर्शवली.
दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांना 4.7 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना 3.6 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांना 0.9 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. तर 4.8 टक्के मतदारांनी याशिवाय इतरांना पसंती दर्शवली आहे. त्याशिवाय सांगता येत नाही असे 10.2 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.