मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत ड्रग्ज पार्टी प्रकरणी नवीन माहिती उजेडात आणली आहे. 'क्रूझ प्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी नवाब मलिक वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी उघड करत असल्याचं बोललं जात आहे. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्या समोर आणणं माझं काम आहे,' असे मलिकांनी सांगितलं.
क्रूझशिप ड्रग्ज पार्टी प्रकरणात नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. ड्रग्ज पार्टी सुरू असलेल्या क्रूझवर एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया होता आणि त्याचे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंशी (Sameer Wankhede) मित्रत्वाचे संबंध असल्याची माहिती मला मिळाली आहे, असे नवाब मलिक म्हणाले. या पार्टीत नाचताना एक दाढीवाला आहे तो दाढीवाला कोण आहे हे एनसीबीच्या अधिकार्यांना माहीत आहे असा गौप्यस्फोटही नवाब मलिक यांनी आज केला.
क्रुझवरील पार्टी ही फॅशन टिव्हीने आयोजित केली होती. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय आणि कोविड नियमांचे पालन न करता थेट सिपिंग डायरेक्टरची परवानगी घेऊन करण्यात आली होती. त्या जहाजावर टार्गेट करून काही लोकांचे फोटो घेऊन ट्रॅक करण्यात आले. त्या पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया होता. त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड होती ती हातात खतरनाक रिव्हॉल्व्हर घेऊन उपस्थित होती, असे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नवाब मलिक म्हणाले, ''जे चौकशी अधिकारी आले आहेत, त्यांनी क्रुझवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले तर त्यांना त्या पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया उपस्थित होता हे दिसेल. खेळ तर झाला परंतु खेळाचा खेळाडू गाडी घेऊन का फिरत आहे याचं उत्तर एनसीबीने द्यावे. हे आज बोलत आहे त्याचे पुरावे येत्या काही दिवसात आपल्यासमोर ठेवणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
''समीर वानखेडे आणि क्रुझवरील रेव्ह पार्टीतील दाढीवाला ड्रग्ज माफीया यांच्यात दोस्ताना असून त्यामुळेच त्याला कारवाईतून वगळण्यात आले आणि इतर लोकांना टार्गेट केले गेले आहे. याबाबतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज चौकशी समिती आली आहे, त्यांनी चेक करावे. त्यात त्यांना काही सापडत नसेल तर जे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वरसिंग माझ्याकडे येत असतील तर ते पुरावे द्यायला तयार आहे. माझा चौकशी समितीवर सवाल नाही परंतु हे प्रकरण गंभीर असून ते गंभीरतेने घेतले गेले नाही तर पुरावे सार्वजनिक करण्यात येतील,'' असा इशारा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत आज दिला.
आज समीर वानखेडे याचे मुस्लिम पध्दतीने जे लग्न झाले त्याचा फोटो आणि लग्नपत्रिका ट्वीटरवर शेअर करुन नवाब मलिक यांनी आणखी एका बोगस प्रकरणाचा पर्दाफाश केला. ''एनसीबीच्या अधिकार्याने एक पत्र माझ्याकडे पाठवले होते ते पत्र डीजी आणि एनसीबीकडे माझ्या लेटरहेडवरुन पाठवले आहे. सीबीसीच्या मार्गदर्शक सुचनेवरुन निनावी पत्राची चौकशी होत नाही, परंतु ज्यापध्दतीने त्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे, त्याकडे दुर्लक्ष केले तर संपूर्ण यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होवू शकतो,'' असेही नवाब मलिक म्हणाले.
समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी जी समिती आली आहे. त्यांनी पंचांना बोलावले आहे. एनसीबी इलेक्ट्रॉनिक पुराव्याआधारे कारवाई करते असे सांगितले जाते. प्रभाकर साहीलने संपूर्ण घटना प्रतिज्ञापत्र व व्हिडीओ करुन तो प्रसारित केला आहे. जी चौकशी समिती आली आहे त्यांनी समीर वानखेडे, के. पी. गोसावी, प्रभाकर साहील आणि वानखेडे यांचा ड्रायव्हर माने या सर्वांचा सीडीआर काढावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.