
उद्धव साहेब ठाकरे यांनी अजमेर शरीफ येथील हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गाच्या 813 व्या उरुसा निमित्त 'मातोश्री' येथून रवाना केलेली चादर आज खादीम सय्यद झिशान चिश्ती यांच्यासोबत अजमेर ख्वाजाच्या दरबारी अर्पण करण्यात आली . यासोबत ठाकरे गटाचे पावसकर आणि इतर पदाधिकारी होते.
मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना डांबून टोकाचे पाऊल उचलले आहे. आमदार पिपंळे म्हणाले, पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना मूर्ख बनवत तर लोकप्रतिनिधींची दिशाभूल करीत आहेत.
भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट करून माहिती दिली आहे. माझ्यावर विश्वास दर्शवल्याबद्दल अमित शाह यांचे मी आभार व्यक्त केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अंजली दमानिया यांनी कैलास फडचा गोळीबार करतानाचा व्हिडीओ सोशल माध्यमावर पोस्ट केला होता. कैलास फड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला अटकदेखील झाली होती. यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शस्त्र परवानाधारकांची फेर तपासणी करण्यात आली. यानंतर कैलास फड, माणिक फड आणि जयप्रकाश सोनवणे या तिघांची शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.
26 जानेवारी पर्यंत कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री समजेल अशी प्रतिक्रिया यापूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. मात्र आज झालेल्या एका कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतःचेच नाव घोषित केले आहे.
राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा गेल्या काही दिवसापासून करण्यात आलेली नाही. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमवारी रात्री याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार भेट घेणार आहेत. त्या दोघांची बैठक झाल्यानंतर लवकरच राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा काही वेळातच होण्याची शक्यता आहे.
भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याकडे पिस्तुलसह 28 काडतुसे आढळून आली. पुण्याहून हैदराबादला जात असतानाच्या प्रवासात हे शस्त्र आढळून आले असून पोलिसांनी ते जप्त केले आहे. याप्रकरणी, पुढील तपास सुरू आहे. पुणे एअरपोर्टवरील सुरक्षा यंत्रणेकडून दिपक काटेला अटक करण्यात आली आहे. दिपक काटे हा मुळचा पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा रहिवाशी असून तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेचा संस्थापकही असल्याचे समजते.
बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी बांधव आक्रमक झाले आहेत. यावेळी ओबीसी आंदोलकांनी थेट पोलीस ठाण्यासमोरच आंदोलन केले आहे. परभणी येथे झालेल्या मोर्चात मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांच्या विषयी आक्षेपहार्य विधान करत ओबीसी समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं, असा आरोप ओबीसी बांधवांनी केला आहे. तर या विषयीच्या तक्रारीवरून बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यामध्ये, मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. विष्णू चाटे हा खून आणि खंडणी प्रकरणातील आरोपी आहे. न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे, महेश केदार, प्रतिक घुले या तिघांच्या देखील पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. 18 जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवणायचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. आमदार पिंपळे यांनी विमा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना चक्क सरकारी विश्रामगृहाच्या खोलीत डांबलं असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शेतकर्यांना न्याय मिळेपर्यंत अधिकाऱ्यांना खोलीतून बाहेर काढणार नसल्याचा इरादाही आमदार पिंपळे यांनी बोलून दाखवला.
काँग्रेसकडून काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह विदर्भातील 8 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला आव्हान देत न्यायालयात धाव घेतली होती. आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी नागपूर आणि मुंबई खंडपीठात दाखल याचिका दाखल केली आहे.यात थेट निवडणुकच रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. यात सलील देशमुख, रमेश बंग, विक्रम सावंत, राहुल कलाटे, महेश गनगाने, जयश्री शेळके या उमेदवारांनी सोमवारी(ता.6) न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
कोरोना महामारीनंतर आता चीनसह जगभरात आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) वेगाने पसरत आहे. भारतात देखील आतापर्यंत तीन जणांना HMPV व्हायरसची लागण झाली आहे. तर दुसरीकडे प्राणी संगहालयांमध्ये एव्हियन फ्ल्यू या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्यापासून राज्यातील प्राणी संग्रहालय काही काळासाठी बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर सोमवारी(ता.6) उशिरा याविषयी निर्देश येण्याची शक्यता आहे.
भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्याकडून दिल्लीतील 'इंडिया गेट'चे नाव बदलण्याची मागणी केली आहे. त्यांनी पीएम मोदींना पत्र लिहून इंडिया गेटचे नाव बदलून 'भारत माता द्वार' असे म्हटले आहे. हीच भारतातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असंही त्यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात सिद्दीकी यांनी केली आहे.
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात करकेलीजवळ नक्षलवाद्यांनी जवानांनी भरलेल्या पिकअप वाहनाचा स्फोट केला आहे.नक्षल ऑपरेशन्सचे एडीजी विवेकानंद सिन्हा यांनी या हल्ल्यात आतापर्यंत 9 जवान शहीद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.तसेच या हल्ल्यातील शहिदांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक जवान जखमी झाले आहेत.नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे.सोमवारी पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला नक्षलवाद्यांनी स्फोटक यंत्राने उडवलं. या घटनेत आठ पोलीस आणि एक चालक असे एकूण ९ जण शहीद झाले आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चोहोबाजूंनी टीका झाली आहे. अगदी स्वपक्षातील प्रकाश सोळुंखे यांच्यासह विरोधी पक्षातील आमदार, तसेच त्यांचे एकेकाळचे मित्र सुरेश धस यांच्याकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. वाल्मिक कराडच्या माध्यमातून धनंजय मुंडेंवर जोरदार प्रहार केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. त्या भेटीत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात नऊ जवान शहीद झाले आहेत. आठ जवान जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटाद्वारे लष्कारचे वाहन उडवून दिले. हे लष्करी जवान दंतेवाडा, नारायणपूर, बिजापूरच्या संयुक्त ऑपरेशननंतर परत येत होते.
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. त्या विरोधात महाराष्ट्र सरकारने हरकत घेतली आहे. कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात प्रसंगी कोर्टात जाण्याची तयारी ठेवली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा धोका अधिक होऊ देणार नाही. अलमट्टीची उंची वाढवण्याला महाराष्ट्र सरकारचा विरोध राहील, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याबाबत महाराष्ट्र सरकारने समिती नेमली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या खून प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने ४५९० पानांचे आरोपपत्र किल्ला कोर्टात दाखल केलं आहे. हे आरोपपत्र २६ अटक आणि ३ फरारी आरोपींच्याविरोधात दाखल करण्यात आलेले आहे. आरोपपत्रात एकूण १८० साक्षीदारांच्या जबाबाचा समावेश करण्यात आलेला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील विष्णू चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि जयराम चाटे यांची पोलिस कोठडी आज संपत असल्याने पोलिसांनी त्यांना केजच्या न्यायालयात हजर केले आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. आरोपींची पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी पोलिसांच्या वतीने वकिलांनी केली आहे, तर पोलिस कोठडी मागण्यासाठी अधिकाऱ्यांकडे कोणतीही कारणं नाहीत, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला आहे. न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला ठाणे शहरातील श्रीनगर पोलिसांनी अवघ्या आठ तासांत अटक केली आहे. शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा हितेश धेंडे नावाच्या तरुणाचा व्हिडिओ रविवारी व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत धमकी देणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.
परभणी घटनेच्या निषेधार्थ आणि विविध मागण्या घेऊन आंबेडकरवादी संघटनेने बीडमध्ये मोर्चा काढलाय. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले आहेत.
भारतात आलेल्या नवीन व्हायरस बद्दल सरकार गांभीर्याने दखल घेत आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. राज्य सरकार प्रत्येक नागरिकाची चांगली काळजी घेईल.
येत्या दोन दिवसात आरोग्य विभागाची बैठक मुंबईत घेतली जाणार आहे. बैठकीनंतर या रोगाबद्दल घेण्यात येणाऱ्या काळजी बद्दलचे निर्देश जाहीर केले जातील. राज्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार असून निवडणूक आयोगाने मतदारांची अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे.
प्रशांत किशोर बीपीएससी उमेदवारांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले होते. सोमवारी सकाळी पोलिसांनी अटक केली होती. त्या केसमध्ये प्रशांत किशोर यांना पाटणा सिव्हिल कोर्टातून जामीन मिळाला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आज मोठी घोषणा केली आहे. आम आदमी पार्टीच्या महिला सन्मान योजनेला शह देण्यासाठी दिल्लीतील काँग्रेसच्या कमिटीने 'प्यारी दीदी योजना' जाहीर केली आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनात एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. अर्थसंकल्प मांडला जाणार असून त्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत अर्थ मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडणार आहे.
धाराशिव जिल्यात धक्कादायक घटना घडली आहे. पारधी समाजाच्या 2 गटात हाणामारी झाल्याने 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. शेतात पाणी देण्यावरून मध्यरात्री रात्री ही घटना झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून 10 आरोपींना संशियत म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नागपूरमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त
बॅरिकेटिंग करून घरासमोरील वाहतूक वळवली
भेटायला आलेलेल्या लोकांना परवानगी घेऊन सोडले जात आहे आत
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विविध मागण्यासाठी धाराशिवमध्ये येत्या 10 जानेवारीला सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते आणि नागरिक सहभागी होतील.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात नेमलेल्या SIT पथकावरून अनेकांनी आक्षेप घेतल्यानंतर तिघांची उचलबांगडी करण्यात आली आहे. एपीआय महेश विघ्ने, हवालदार मनोज वाघ यांच्यासह आणखी एकालाही एसआयटीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या आक्षेपानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागमी संभाजीराजे यांनी केली आहे.
अख्या जगात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. यामुळे अख्खं जग लॉकडाऊन झालं होतं. आता चिनमध्ये HMPV कोरोना सारखा नवा विषाणू सापडल्यामुळे चिंतेचे सावट निर्माण झाले होते. दरम्यान HMPV कोरोना सारखा हा विषाणू भारतात पोहचला आहे. बंगळूरूमध्ये पहिला रूग्ण सापडला असून चिमुकल्या मुलीला याची लागण झाली आहे.
राज्यासह देशभर गाजत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आक्रोशमोर्चे काढले जात आहेत. यानंतर आज (ता.6) सर्वक्षीय शिष्टमंडळ हे राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्ष, पवार गट, ठाकरे गट, शिंदे गट, अजित पवार गटाचे नेते असतील.
महायुतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्यातील पात्र लाडक्या महिलांना 2100 रूपये दिले जातील, असा दावा महायुती सरकारमधील एका मंत्र्याने केला आहे. यामुळे राज्यातील लाखो पात्र महिलांना आता लवकरच 2100 रूपये थेट खात्यावर मिळण्याची शक्यता आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल के.सी. राधाकृष्णन् यांना भेटणार आहे. काल पुण्यात देशमुख हत्या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेत्यांनी देशमुख यांच्या आरोपींना फाशी द्या, अशी मागणी केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. परेश चाळके यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर संबधित २४ वर्षांच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांच्या ठाण्यातील घरावर गोळीबार करणार असल्याची धमकी या युवकाने दिली आहे. याबाबतचा व्हिडिओ त्यांने समाज माध्यमावर व्हायरल केला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर पोलीस प्रशासनाने मोठे पाऊल उचलेले आहे. कर्तव्यात कुचराई करणा-या पोलीस अधिका-यांवर कारवाई केली आहे. बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी चार पोलीस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. देशमुख हत्येनंतर बीड पोलिसांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तत्कालीन एसपी अविनाश बारगळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदली केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.