
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या कॅबिनेटने मंगळवारी मोठा निर्णय घेतला. सरकारने सर्व वाहनांसाठी FASTag अनिवार्य केले आहे. हा निर्णय 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल. या निर्णयामुळे वाहतूक कोंडीपासून वाचण्यासोबतच इंधन आणि वेळेचीही बचत होईल.
आज बीडमधील मस्साजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईत पोहचले होते. याप्रसंगी आमदार सुरेश धस हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची साधारण दीड तास चर्चा झाली. यानंतर संतोष देशमुख यांच्या बंधुंनी या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही काय मुद्दे मांडले आणि मुख्यमंत्र्यांनी काय सांगितल, याबाबत मीडियला माहिती दिली. आम्हाला केवळ न्याय हवा आहे आणि तो कसा मिळेल हे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे, असं संतोष देशमुख यांचे बंधू म्हणाले आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी त्यांचं कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, ते सकाळीच मुंबईच्या दिशेनं रवाना झालं. पण देशमुख यांच्या कुटुंबाचा अपघात थोडक्यात टळला आहे. टोलमधून बाहेर पडताना वाहन अडवण्यासाठी बसवलेल्या बॅरिअरला देशमुख यांच्या कुटुंबीयांची गाडी धडकली. सुदैवानं मोठा अपघात झाला नाही.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन भाजप आमदार सुरेश धस यांनी राजकारण तापवलं आहे. त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असून मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही निशाना साधला होता. आता धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने नव्या चर्चांना उधान आले आहे. धस यांनी ही भेट मल्टिस्टेट बँकांच्या संदर्भात घेतल्याची माहिती मिळत आहे.
विशाळगडावर जिल्हा प्रशासनाने लागू केलेली संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. प्रशासनाने संचारबंदी शिथिल करताना पर्यटकांसाठी गड खुला केला आहे. तर पर्यटकांना सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान गडावर जाता-येता येणार आहे. दरम्यान गडावरील संचारबंदी उठवण्यासाठी गडावरील नागरीकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (कोल्हापूर)धरणं आंदोलन केले होते.
पंकजा मुंडे यांना आमदार सुरेश धस यांनी सतत टार्गेट केलं होतं. आता पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. या प्रकरणात एसआयटीची स्थापनेची पहिली मागणी आपण केली होती. याबाबत पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना दिल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून मंगळवारी (ता.७) मुंबईत सरपंच परिषदे झाली. यावेळी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी, या प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीसाठी आपण प्रयत्न करत असल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी या प्रकरणातील आकाचे 'तेरे नाम' चित्रपटातील सलमान खानसारखी अवस्था झाली पाहिजे असे म्हटले आहे.
भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात विविध मागण्यांबरोबर देशमुख कुटुंबियांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी ते म्हणाले, "या प्रकरणापासून अनेक गोष्टी पुढे आणल्या जात आहेत. कधी अभिनेत्रींना पुढे घातलं जातं कधी तिसरचं. दोन कोटीच्या खंडणीच्या आड संतोष देशमुख आडवा आला. एका दलित व्यक्तीला मारहाण करताना आडवा पडला म्हणून त्याची क्रूर हत्या झाली. या आरोपींवर 'मोकका' आणला पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे ज्या ज्या मागण्या केल्या, त्या त्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या.आज आम्ही उज्वल निकम यांची आॅर्डर कशी निघेल यासाठी प्रयत्न करतोय. माजी मुख्यमंत्री अंतुले यांच्यानंतर देवेंद्रजी हेच पाॅझिटिव्ह मुख्यमंत्री आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट मी आज मुख्यमंत्र्यांशी घालून देणार आहे. आका असो, किंवा आकाचा आका असो किंवा बाका, असो कोणालाही सोडणार नाही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल आहे".
सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी दूरदृष्य (व्हीसी) प्रणालीद्वारे संवाद साधला. राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या. या सूचनांवर काय कार्यवाही केली, याबाबत 15 एप्रिल 2025 रोजी आढावा घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते. कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करा, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल, अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करा. सरकारी कार्यालयांची स्वच्छता करा, अनावश्यक कागदपत्रे काढून टाका, खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
- विभाग, कार्यालयाचे वेबसाईट अद्ययावत करा
- ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करा
- सरकारी कार्यालयात स्वच्छता मोहिम राबवा
- नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढा
- उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या
- सरकारच्या महत्वाच्या प्रकल्प आणि योजनांच्या प्रकल्पांना भेटी द्याव्यात
- सरकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या
लोकांमध्ये दहशत पसाराविण्याच्या उद्देशाने हातातील पिस्तूलाद्वारे हवेमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी एका तरुणास मोहोळ पोलिसांनी (Police) अटक केली आहे.विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत भोसले, असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला मोहोळ न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रशांत भोसले याच्या घरातून पोलिसांनी एक काळ्या रंगाची स्पेटिंग रायफल, चार जिवंत काडतूस, एक सिल्वर रंगाचे भारतीय बनावटीचे पिस्तूल, मॅगझिनमधून सात जिवंत काडतूस ही जप्त केली आहेत.
बीडमधील खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड हा 31 डिसेंबरला पुणे येथील CID कार्यालयात सरेंडर झाला. पुणे CID कार्यालयात येताना वाल्मिक कराड आलीशान वाहनातून आला होता. वाल्मिक कराड याला सोडल्यानंतर हे वाहन चांगलेच चर्चेत आले होते. यावरून आरोप-प्रत्यारोप देखील झाले होते. CID च्या पथकाने हे वाहन आता ताब्यात घेतलं आहे. दरम्यान आता याबाबत नेमकी काय कारवाई केली जाते? याकडे लक्ष लागलेले आहे.
दिल्लीत पाच फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान होईल, अशी माहिती केंद्रीय निवडणूक (Election Commission) आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. आठ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. दिल्ली विधानसभेला 70 जागांसाठी ही निवडणूक होणार असून, एकूण 1.55 कोटी मतदार आहेत. 2.8 लाख मतदार हे युवक म्हणजे पहिल्यांदा मतदान करणारे आहेत. दिल्लीत एकूण 13 हजार 033 मतदार केंद्र आहेत. दिल्ली विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होईल.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला सुरूवात होताच केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएम हॅक केल्याच्या आरोपांवर उत्तर दिलं. ते म्हणाले, मॉकपोलवेळी सर्व पक्षाचे लोक उपस्थित असतात. शिवाय ईव्हीएम हॅक होऊच शकत नाही, हे कोर्टाने देखील स्पष्ट केलं आहे की EVM हॅक करता येत नाही. मात्र, सोशल मीडियातून हे नरेटिव्ह पसरवलं गेलं की EVM हॅक केलं. पण ते कोणत्याही परिस्थित शक्य नाही, असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषद घेत HMPV व्हायरसबाबत योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केलंं आहे. हा विषाणू गंभीर नाही, त्याचा धोका जास्त नाही. मात्र तरीही सर्वांनी काळजी घ्यावी, घाबरून जाऊ नये, असं आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केलं.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्याच्या कोनाकोपर्यात उमटत असून या घटनेमुळे सर्व सरपंचांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. हे असचं सुरू राहिलं तर दोन जातींमध्ये तेढ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी. शिवाय मंत्री धनंजय मुंडेंनी स्वत:हून आतापर्यंत राजीनामा द्यायला पाहिजे होता, अशी प्रतिक्रिया सरपंच परिषदचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिली.
प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा माजी आमदार बच्चू कडू यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर निवडणूकांनंतर मोर्चा काढला आहे. या आंदोलनात ते मेंढपाळाच्या वेशात आले आहेत.
महाराष्ट्रातील सर्व वाहनांना 1 एप्रिलपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
बलात्कारप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणास्तव त्यांना 31 मार्चपर्यंत जामीन देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध करुणा मुंडे यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज भारतपोल पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले. सीबीआयने हे पोर्टल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील तपास यंत्रणांना इंटरपोलची मदत घेण्यासाठी लागणारा कालावधी अत्यंत कमी होणार आहे. तसेच तपासालाही वेग मिळणार आहे.
अखेर महाराष्ट्रात HMPV व्हायरसचा शिरकाव झाल्याची बातमी समोर आली असून नागपुरातील दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना केली असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे जावं लागणं हे दुर्दैव आहे. जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा देत नाही आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार असल्याचा इशारा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर संभाजीराजे छत्रपती कोल्हापुरात बोलत होते.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अशातच धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला असल्याचे वृत्त समोर आले होते. पण साम टीव्हीशी बोलताना धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. मी राजीनामा दिला नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी मनसे सज्ज झाली असून. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विभाग अध्यक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा सुरु करण्यात येणार असून आगामी पालिका निवडणुकीची रणनिती ठरवली जाणार आहे.
निवडणूक आयोग आज दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. यासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या तारखाही जाहीर करण्याची शक्यता आहे.
काश्मीर खोऱ्यातील नगरोटा आणि बडगाम या दोन विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. नगरोटा येथील भाजप आमदार देवेंद्रसिंह राणा यांच्या निधनामुळे तर ओमर अब्दुल्ला यांनी बडगामची जागा रिक्त केल्यानंतर या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होऊ शकते.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट घेणार आहे. फडणवीस यांच्यासमोर देशमुख कुटुंब आपली बाजू मांडणार आहे. आमदार सुरेश धस यांची यासाठी पुढाकार घेतला आहे.
Beed News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे. मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही नुकतीच भेट घेतली आहे. या भेटीत अजितदादांनी आपला राजीनामा मागितला नसल्याचे मुंडे यांनी माध्यमांना सांगितले. अजितदादांनी माझा राजीनामा मागितला तर मी राजीनामा देईन, असे मुंडे म्हणाले.
Delhi election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहे. त्यानंतर आजपासूनच दिल्लीत आचारसंहिता लागू केली जाईल. फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे.
अंमली पदार्थांची तस्करी करणारा दिवंगत गुन्हेगार, डॅान दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्बाल मिर्ची याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका दिला आहे. गिरगाव येथील इक्बाल मिर्ची याची एक मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्याची सर्व जमीन ईडीने कारवाई करत ताब्यात केली आहे. इक्बाल मिर्ची याच्या साथीदारांनी एका सिनेमा हॉलमध्ये धुडगूस घालून नासधूस केली होती. त्यानंतर त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
अखेर महाराष्ट्रात HMPV व्हायरसचा शिरकाव झाल्याची बातमी समोर आली असून नागपुरातील दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 7 वर्षाच्या मुलाचा आणि 13 वर्षीय मुलीचा रिपोर्ट 3 जानेवारीला खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह आल्यामुळे आता लोकांमध्ये चिंतेंच वातावरण आहे. या दोघांना खोकला आणि ताप होता. या मुलांना HMPV ची लागण झाली असली तरी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसून ते आता आजारातून बरे झाल्याची माहिती आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थांनी मनसेच्या सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव आणि आगामी महापालिका निवडणुकी संदर्भातला आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.
पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची आल्हाट अशी या 5 नगरसेवकांची नावे आहेत. दुपारी 1.00 वाजता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशमुंबई अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश करणार आहेत.
मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलजवळ एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एमआरए पोलिसांच्या हद्दीत ही गोळीबाराची घटना घडली आहे. तर गुन्हे शाखेचे पोलिस प्रत्यक्षदर्शी व्यक्तींकडे या गोळीबार प्रकरणाची चौकशी करत आहेत.
मंगळवारी सकाळी दिल्ली, बिहारसह पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. सकाळी साडेसह वाजण्याच्या सुमारास नेपाळमध्ये 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या लोबुचेपासून 93 किमी उत्तर-पूर्वेला होता. नेपाळमध्ये झालेल्या भूंकपाचे हादरे भारत, बांग्लादेश आणि चीनमध्ये जाणवले आहेत. अद्याप कुठेही कोणतीही हानी किंवा जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी ई-कॅबिनेटची संकल्पना राबवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीत या प्रयोगाचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सुत्रांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.